साखरीटोला : तालुक्यातील ग्राम वळद येथील सांझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवडी या गावांसाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावी, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. यासाठी गावकऱ्यांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि.२४) निवेदन दिले आहे.
वळद येथील साझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवळी या ४ ग्रामपंचायतींचे काम आणि तिगाव सांझा अंतर्गत येणाऱ्या तिगाव, बघेडा, आसोली व फुक्कीमेटा या चार गावांचे काम एकाच तलाठ्याकडे देण्यात आले आहे. अशात एकाच तलाठ्याला श्रावणबाळ, निराधार, उत्पन्नाचा दाखला, सातबारा इत्यादी काम करणे त्रासदायक होत आहे. परिणामी नागरिकांची कामेही अडकून पडल्याने त्यांची डोकेदुखी वाढत असून, कित्येकदा नुकसान होत आहे. करिता वळद साझा क्रमांक-२०साठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जियालाल पंधरे, ओबीसी महासंघाचे सचिव अजय बिसेन, गेंदलाल यावलकर, उपसरपंच घनिराम बिसेन, उपसरपंच ललीत ठाकूर, सरपंच दुर्गेश पटले, सरपंच लखन भलावी व गावकरी उपस्थित होते.