गोंदिया : सप्टेंबर महिन्यात पावसाचा आलेख पाहता आतापर्यंत २१ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ३४३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यात २१ दिवसांपैकी दोन दिवस निरंक असतानाच सर्वाधिक ४९.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यावासीयांना यंदा पावसाने चांगलेच भंडावून सोडले. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला असता जिल्ह्यात अपवाद वगळता पावसाचे महत्त्वाचे सर्वच नक्षत्र कोरडे गेले. परिणामी जिल्ह्यातील नदी-नाल्यांमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता, तर जिल्ह्यातील धरणांसह इतर प्रकल्प कोरडेठाक होते. त्यामुळे जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट घोंगावू लागले होते. शेतकरीदेखील पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून होते. विशेषत: राज्यातील इतर जिल्ह्यांत जोरदार पावसाची नोंद होत असताना व नदी-नाल्यांना पूर येत असताना गोंदिया जिल्ह्यात त्याचे उलट चित्र होते. विशेषत: खंडित पावसामुळे जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झालेली नव्हती. मागील जुलै महिन्यात २३३ मिमी व ऑगस्ट महिन्यात केवळ २१९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार एंट्री केली. या महिन्यातील २ व १९ या दोन तारखा वगळता प्रत्येकच दिवशी पावसाची नोंद झाली आहे. १० सप्टेंबर रोजी ४७.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली, तर १२ सप्टेंबर रोजी पुन्हा सर्वाधिक ४९.३ मिमी पाऊस झाला. आजच्या तारखेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहता ३४३ मिमी पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. महिना संपण्यास ८ दिवस शिल्लक असून, संबंधित विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बॉक्स.......
९७.९ टक्के पाऊस
जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या मान्सून कालावधीत १२२० मिमी पावसाची नोंद करण्यात येत असताना १ जून ते आजच्या तारखेत ११६०.७ मिमी अपेक्षित आहे. या तुलनेत आतापर्यंत ११३६.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची टक्केवारी ९७.९ टक्के आहे, तर मान्सून कालावधीच्या तुलनेत जिल्ह्यात ९३.१ टक्के पाऊस झाला आहे.
बॉक्स....
मागील वर्षीपेक्षा कमीच
जिल्ह्यात पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस सरासरी गाठत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीची नोंद पाहता व सध्याची होत असलेली पावसाची नोंद यावरून जिल्ह्यात पाऊस सरासरीच्या जवळ पोहोचला आहे. असे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमीच पाऊस झाल्याचे वास्तव असून, मागील वर्षी आजच्या तारखेत १२८७.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्याची टक्केवारी ११०.९ होती, तर मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे.