गोंदिया : जिल्ह्यात कोरोना आपले रौद्र रूप दाखवित असतानाच रविवारी (दि.११) जिल्ह्यात तब्बल १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे, तर ७४५ नवीन बाधितांची भर पडली असून १६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची नोंद घेण्यात आली आहे. या आकडेवारी नंतर कोरोनाला घेऊन जिल्ह्यातील सर्वच रेकॉर्ड मोडले गेले आहेत. शिवाय, ही धडकी भरविणारी आकडेवारी बघून तरी आता खबरदारी शिवाय दुसरा पर्याय नाही हे दिसून येत आहे.
जिल्ह्यात रविवारी (दि.११) आतापर्यंत सर्वाधिक ७४५ बाधितांची भर पडली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३७८, तिरोडा ७४, गोरेगाव ५८, आमगाव ५९, सालेकसा १९, देवरी ३९, सडक-अर्जुनी ६०, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४८ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्ण आहेत. तर १६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८८, तिरोडा १८, गोरेगाव ११, आमगाव १७, सालेकसा ४, देवरी ११, सडक-अर्जुनी ८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९, तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे.
यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०,८१६ झाली असून, १६,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४,५२० क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २,६७४, तिरोडा ४७६, गोरेगाव २०२, आमगाव २६९, सालेकसा ११३, देवरी ११८, सडक-अर्जुनी ३८३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३४, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ५१ रुग्ण आहे. यातील ३२८५ रुग्ण घरीचत अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २१८८, तिरोडा २९३, गोरेगाव ११५, आमगाव १४९, सालेकसा ६७, देवरी ५९, सडक-अर्जुनी २१२, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १६८, तर इतर राज्य व जिल्ह्यातील ३४ रुग्ण आहे.
----------------------------
जिल्ह्यासाठी ठरला काळा दिवस
मागील वर्षी मार्च महिन्यातच कोरोना सत्राला सुरुवात झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला होता. मात्र यंदाची स्थिती त्यापासून अधिकाधिक भयावह असून, तब्बल १४ मृत्यू व ७४५ बाधितांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नव्हती. मात्र रविवारी (दि.११) सर्वांना हादरवून सोडणारी आकडेवारी आल्याने रविवारचा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला आहे.
---------------------------------
१९०५ अहवाल प्रतीक्षेत
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापसणी केली जात आहे. यामुळे बाधितांची आकडेवारीही सातत्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये तपासण्यांचे अहवालही प्रलंबित राहत आहेत. मात्र जेवढे जास्त अहवाल प्रलंबित तेवढे जास्त बाधित निघत असल्याचे अनुभव येत आहे. अशात रविवारी १९०५ अहवाल प्रलंबित असल्याने आता सोमवारी किती बाधितांची भर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------------
आता ‘घरी रहा’ हाच मंत्र फायद्याचा
शासनाकडून सुरुवातीपासूनच नागरिकांना ‘घरी रहा’ असे आवाहन करीत आहे. मात्र नागरिक कोरोनाला हलक्यात घेत मनमर्जीपणाने वागताना दिसत आहेत. हेच कारण आहे की, अपेक्षा नसावी एवढ्या वाईट परिस्थितीला आता सामोरे जावे लागत आहे. तब्बल १४ जणांचा मृत्यू यापेक्षा अधिक धक्कादायक बाब जिल्ह्यासाठी नाही. त्यामुळे आता ‘घरी रहा-सुरक्षित रहा’ हाच मंत्र सर्वांसाठी फायद्याचा ठरणार आहे.