अर्जुनी-मोरगाव : तालुक्यावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. तालुक्यातील प्रतापगड किल्ला हा भोसलेकालीन साम्राज्याची ओळख आहे. हिंदू धर्मीयांचे प्राचीन शिवमंदिर आणि मुस्लीम धर्मीयांचे बाबा उस्मान गणी हारुनी यांचा दर्गा हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे दर्शन घडविणारे एकमेव प्रसिद्ध स्थान आहे. तालुक्यात पर्यटनास मोठ्या प्रमाणावर वाव आहे. प्रतापगड येथे पर्यटन सर्किट उभारण्यास प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
प्रतापगड येथे पर्यटन विकास निधी अंतर्गत विविध विकास कामांची सुरुवात करताना ते बोलत होते. याप्रसंगी पर्यटन विकास निधी अंतर्गत महादेव पहाडी प्रतापगढ रस्त्याचे रुंदीकरण व अल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत कब्रस्तान आवारभिंतीच्या कामाची सुरुवात आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सरपंच भोजराम लोगडे, उपसरपंच उमेश मडावी, राकेश जायस्वाल, सदस्य छाया डोंगरवार, रेवता गहाने, गीता बावने, नलू हुर्रा, प्रकाश सलामे, हर्षा राऊत, सुखदेव कनोजे, ग्रामसेवक डी.जी. दरवडे आणि प्रतापगड येथील गावकरी उपस्थित होते.