रेकॉर्डवरील चार मुली गवसल्या : इतर १ मुलगी व २ मुलेही सापडलीगोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या १८ वर्षाखालील बालकांचे प्रमाण पाहून राज्य शासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन ‘मुस्कान’ ही मोहीम राबविली. जून महिन्यात चवथ्यांदा चालविलेल्या या आॅपरेशन मुस्कानने गोंदिया जिल्ह्यात ७ बालकांना शोधण्यात जिल्हा पोलिसांना यश आले. मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने जून महिन्यात आॅपरेशन मुस्कान या अभियानाला जिल्ह्यात राबविले. गोंदिया जिल्ह्याच्या रेकार्डवर असलेल्या १६ पैकी ४ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले. आता रेकार्ड वरील ६ मुले व १२ मुली अशा १८ बालकांच्या शोध गोंदिया जिल्हा पोलिसांना घ्यावा लागणार आहे.जुलै २०१५, त्यानंतर जानेवारी २०१६, मार्च व आता जून २०१६ मध्ये आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क करण्यात आला. गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ बालके, डुग्गीपार, देवरी, रावणवाडी व गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एक अश्या सात बालकांचा शोध घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी) आतापर्यंत शोधले ४६ बालकेआॅपरेशन मुस्कान प्रकल्पात पोलिसांनी जुलै २०१५ या महिन्यात ३१ बालकांचा शोध लावला होता. त्यानंतर दुसऱ्या मुस्कानमध्ये जानेवारी महिन्यात ६ व तिसऱ्या मुस्कानमध्ये मार्च महिन्यात २ बालकांना शोधला तर चवथ्या आॅपरेशन मुस्कान मध्ये ७ बालकांना शोधून त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यात आले. अजूनही ६ मुले व १२ मुली अश्या १८ बालकांना शोध लागला नाही.
‘आॅपरेशन मुस्कान’ मध्ये शोधली सात बालके
By admin | Published: July 07, 2016 1:49 AM