गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधील ७ रुग्णांचा शुक्रवारी (दि.१६) मृत्यू झाल्याची चर्चा शहरात सुरु होती. यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रत्यक्षात अशी घटना घडली नसल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी केला. तसेच ही केवळ अफवा असल्याचे सांगितले.
मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन आठवड्यात ७५०० बाधितांची नोंद झाली असून १२१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातच शुक्रवारी जिल्ह्यात २९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. नेमकी हीच बाब जोडत २९ मृतांपैकी ७ जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची चर्चा शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहर पसरली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. मात्र प्रत्यक्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन याची माहिती घेतली असता असा कुठलाच प्रकार घडला नसल्याची माहिती पुढे आली. काही जणांनी ऑक्सिजन तुटवड्याची बाब धरुन ही अफवा पसरविल्याचे सांगितले. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे सांगत ही केवळ अफवा असल्याचे लाेकमतशी बोलताना सांगितले.
........
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तर कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. त्यामुळे बरेचदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचाराला घेऊन डॉक्टरांशी वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील दोन दिवसांपासून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.