बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यातील धादरी-उमरी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दूरवर पायपीट करावी लागत आहे. तर जनावरांना सुध्दा पाणी मिळणे कठीण झाले आहे. गावातील नळाला पुरेसे पाणी येत नसून गावालगतचा नाला पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
धादरी-उमरी हे एका गट ग्रामपंचायतमध्ये येणारे दोन गावे आहेत. या दोन्ही गावांच्यामधून एक नाला वाहतो. नाल्याच्या एकीकडे धादरी तर दुसरीकडे उमरी हे गाव आहे. आता उन्हाळा लागला असून गावात भीषण पाणी टंचाई सुरू झाली आहे. नळ योजनेचे पाणी केवळ पाच ते दहा मिनिटे सुरू राहते. पुरेसे पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. दोन्ही गावांच्या मधील नाला पूर्णतः कोरडा झाला आहे. त्यात पाणी नसल्यामुळे आता जेसीबीने नाल्याच्या पात्रात खोदकाम करून पाण्याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे तयार आहे. पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाय योजना करुन टँकरव्दारे पाणी पुरवठ्याची मागणी केली जात आहे.