गोंदिया : सध्या धानाला युरिया खताची अत्यंत आवश्यकता असून ते जर वेळेवर मिळाले नाही तर ऐन बहरात आलेले धान पीक मातीमोल होण्याची शक्यता आहे. हीच संधी साधून खत व्यापाऱ्यांनी कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा निर्माण करून काळा बाजार मांडला आहे. युरिया खताचा काळा बाजार करणाऱ्यांना बेड्या ठोका अशी मागणी तालुक्यातील ग्राम ढाकणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितम मेश्राम यांनी केली आहे.
आपला जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. या धान शेतीवरच येथील शेतकऱ्यांचे जीवन आहे. सध्या धान शेतीला करपा रोगाने ग्रासले असून त्याचे निदान म्हणून युरिया खताची आवश्यकता आहे. ते खरेदीसाठी शेतकरी एकच धावपळ करीत आहेत. हीच संधी साधून खत व्यापारी कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा दाखवून २७० रुपयांची पोती सरळ ५०० रुपयाला विक्री करीत आहेत. ही सर्व माहिती कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाला सुद्धा आहे. खताच्या होणाऱ्या काळ्याबाजारवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाकडून भरारी पथकसुद्धा बनविण्यात आले आहेत. परंतु आजपर्यंत या पथकांनी खत व्यापाऱ्यांना फक्त नोटिसाच दिल्या असून ठोक स्वरूपाची कारवाई केली नाही. त्यामुळे कृषी विभाग हा शेतकरी हिताचा की खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हिताचा असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. युरिया खताची कोणतीही टंचाही नाही असे कृषी विभागाचे म्हणणे आहे तर मग युरियाचा तुटवडा कसा? असा प्रश्न पडत आहे. खताचा काळाबाजार मांडणाऱ्या खत व्यापाऱ्यांवर देशद्रोह कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ बेड्या ठोकाव्यात. तसेच या काळाबाजार प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.