सडक-अर्जुनी : नागालॅंड बॉर्डरवर सोमवारी (दि.२४) सकाळी झालेल्या चकमकीत गोळी लागून तालुक्यातील ग्राम परसोडी येथील सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते हे शहीद झाले होते. गुरुवारी (दि.२७) त्यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता गावी आले व त्यानंतर स्थानिक स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांचा मुलगा कुणाल कापगते व वेद कापगते आणि भाऊ राजेश कापगते यांनी भडाग्नी दिला.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विनायक कापगते यांचे शहीद प्रमोद कापगते हे मोठे सुपुत्र असून ते २० वर्षांपासून सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच सडक-अर्जुनी तालुक्यातील जनतेने हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिव सकाळी ९ वाजता येणार असल्याची चर्चा असल्यामुळे
त्यांना एकदा पाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी म्हणून परिसरातील गावकरी स्त्री-पुरुष मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी तोबा गर्दी केली होती. या प्रसंगाचे आपणही साक्षीदार व्हावे अशी अपेक्षा अनेकांची होती. पार्थिव विनायक कापगते यांच्या घरी येताच नागरिकांनी ‘भारत माता की जय’, ‘शहीद प्रमोद कापगते अमर रहे’ अशा घोषणा दिल्या व त्यांच्या घरी पोलीस मुख्यालयातील चमूने सलामी दिली.
स्थानिक स्मशानभूमीत सीआरपीएफ नागपूरचे पीएसआय सांदेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी सलामी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरीचे अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, प्रभारी उपविभागीय अधिकारी विनोद मेश्राम, डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांजळे, तहसीलदार उषा चौधरी, माजी पालकमंत्री राजकुमार बडोले, माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर उपस्थित होते.