गोंदिया : आपण सोशल मीडियावर सक्रिय असाल तर सावधान ! आपण कोणतीही पोस्ट करताना खात्रीपूर्वक करा, अन्यथा एखादी चुकीची पोस्ट केलात तर आपल्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. परिणामी आपल्याला जेलची हवासुध्दा खावी लागेल.
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम अशा विविध साेशल मीडियावर चर्चा करताना किंवा कोणतीही पोस्ट टाकताना पोस्ट कुणाला आपत्तीजनक तर नाही ना, याचा विचार करूनच ती पोस्ट टाका. अन्यथा आपण टाकलेल्या पोस्टवर कुणी आपत्ती दर्शविल्यास आपल्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. परिणामस्वरूप त्या पोस्टवरून चिघळलेल्या वादाचे गांभीर्य पाहून आपल्याला तुरुंगाची हवादेखील खावी लागू शकते. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
......................
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
- सोशल मीडियावरून आपत्तीजनक पोस्ट केल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याला अटक करून तुरुंगाची हवा देखील खावी लागू शकते.
- कुणी आपत्तीजनक पोस्ट केली तर त्याला समर्थन देऊ नका, त्यावर कमेंट करून तेढ निर्माण होईल असे काेणतेही कृत्य करू नका.
...............
अशी घ्या काळजी
१) सोशल मीडियावरून आपत्तीजनक पोस्ट करू नये, कोणतीही पोस्ट करताना तिची खात्री करूनच पोस्ट करावे.
२) अश्लील- आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ टाकू नये, सामाजिक तेढ निर्माण होईल आणि समाजाची शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
३) कुठलीही पोस्ट आली आणि आपण त्या पोस्टला समजून न घेता सरळ तिला फॉरवर्ड करू नये अन्यथा आपण त्यातही गुन्हेगार ठरू शकता.
...............
मुलींनो डीपी सांभाळा
-मुलींनो आपण सोशल मीडियावर सक्रिय असाल तर आपण आपलीही काळजी घ्या. कारण आपल्या डीपीवर समाजकंटकांचे डोळे आहेत.
- समाजकंटक मुलींच्या डीपी चोरून त्या फोटाेंचा वापर चुकीच्या कामासाठी करतात. अश्लील फोटो किंवा व्हिडिओच्या ठिकाणी त्या फोटोचा वापर करू शकतात.
- अनोळखी व्यक्तीला फॉलो करू नका, आपल्याला संशय आल्यास त्या व्यक्तीला ब्लॉक करा.
..................
सोशल मीडियावर बदनामीचे गुन्हे दाखल
मुलींची सोशल मीडियावर दोस्ती करून तिच्या सोबत केलेले चॅटिंग, संपर्क साधून त्यांच्याशी फोटो, व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकून मुलींना बदनाम केले जाते. मुलींसोबत चॅटिंग करून त्यांचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर टाकून बदनामी केली जाते. या संदर्भात गोंदिया जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
.........................
आधी दोस्ती मग प्रेमनाट्य
सोशल मीडियावर सक्रिय राहणारे बहुतांश लोक नवनवीन फ्रेंड बनवितात. त्या फेंडसोबत सुरुवातीला औपचारिक चर्चा करतात. त्यानंतर आपण जवळचे मित्र आहोत असा देखावा करीत जवळ येतात. काही दिवस चाललेल्या चर्चेनंतर मुले मुलींना प्रपोज करतात व आपली गर्लफ्रेंड बनवून नंतर तिला ब्लॅकमेल करतात.