स्वीकृत सदस्यांची निवड : काँग्रेस, राष्ट्रवादी व आघाडीकडून सभात्याग गोंदिया : गोंदिया नगर परिषद उपाध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे शिव शर्मा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी रिंगणात चार उमेदवारांचे नाव होते; मात्र निवडणुकीच्या वेळी सभागृहात शर्मा यांना सोडून अन्य उमेदवार हजर नसल्याने व त्यांच्याकडून कुणीही मतदान न केल्याने शर्मा यांची १९-० मतांनी निवड करण्यात आली. सभेची नोटीस बोलाविण्याच्या तारखेच्या कारणावरून गोंदिया परिवर्तन आघाडी व काँग्रेसच्या सदस्यांनी तर स्वीकृत सदस्याच्या जागेला घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या कार्यकाळाला ७ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. या कार्यकाळाच्या सुरूवातीच्या पहिल्या टप्यात स्वीकृत सदस्य व उपाध्यक्षांची निवडणूक शुक्रवारी (दि.१०) घेण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाकडून शिव शर्मा यांनी अर्ज सादर केला. गोंदिया शहर परिवर्तन आघाडीकडून संकल्प खोब्रागडे व सचिव शेंडे यांनी तर कॉंग्रेस पक्षाकडून सुनिल भालेराव यांनी अर्ज सादर केला होता. मात्र सभा सुरू होताच सभेची नोटीस बोलविण्याच्या तारखेच्या कारणातून गोंदिया शहर परिवर्तन आघाडी व कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभा त्याग केली. तर स्वीकृत सदस्याच्या जागेला घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सभा त्याग केली व तेही निघून गेले. झालेल्या या गोंधळानंतर मात्र उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. यात उपाध्यक्षपदासाठी अर्ज असलेल्या सुनिला भालेराव, संकल्प खोब्रागडे व सचिन शेंडे यांचे नाव पुकारण्यात आले असता सभागृहात उपस्थित सदस्यांतून कुणीही मतदान केले नाही. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिव शर्मा यांचे नाव पुकारण्यात आले असता भारतीय जनता पक्षाच्या १८ सदस्य व अध्यक्ष अशा १९ मतांनी शिव शर्मा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अशोक इंगळे व त्यांच्या सोबत मुख्याधिकारी चंदन पाटील उपस्थित होते. सभेला बहुजन समाज पक्षाचे सदस्य लोकेश (कल्लू) यादव अनुपस्थित असल्याने उर्वरीत ४१ सदस्य व नगराध्यक्ष उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) दादरीवाल, क्षत्रिय, अग्रवाल व यादव स्वीकृत सदस्य उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांचीही निवड या सभेत करण्यात आली. त्यात भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक दिनेश दादरीवाल, माजी शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, कॉंंग्रेस पक्षाकडून पराग महेश अग्रवाल तर गोंदिया शहर परिवर्तन आघाडीकडून पंकज यादव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या माध्यमातून दादरीवाल व यादव यांची नगर परिषदेत पुन्हा एंट्री झाली. विशेष म्हणजे, गोंदिया शहर परिवर्तन आघाडीचे गठन करण्यात आल्याने त्यांच्याकडे आठ सदस्य झाले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात सदस्य होत असल्याने आघाडीकडे स्वीकृत सदस्याचे पद गेले. परिणामी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हातून ही जागा गेली व यातूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सभा त्याग केली.
नगर परिषद उपाध्यक्षपदी शर्मा
By admin | Published: February 11, 2017 1:09 AM