गोंदिया : गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी ३१ ऑगस्टच्या रात्री ११ वाजता ते १ सप्टेंबरच्या सकाळी ५ वाजता या सहा तासाच्या काळात राबविलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ या उपक्रमात घातकशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या कारवाईत आवेश कन्हैयालाल चतरे (२१) रा. शीतला माता चौक बाजपाई वॉर्ड गोंदिया याचा समावेश आहे. आवेश याला १ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजता सिंगलटोली परिसरातून घातक हत्यारासह अटक करण्यात आली. तर रोहित कैलाश सोनवाने (२०) रा. पिंडकेपार रोज बजाज वॉर्ड गोंदिया याला पहाटे २.३० वाजता भीमनगरच्या बौध्द विहारामागील परिसरात अटक करण्यात आली. त्या दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अन्वये गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदिया शहर पोलिसांनी ३१ ऑगस्टच्या रात्री ऑपरेशन ऑल आऊट राबविले. या ऑपरेशनमध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ३४ सराईत गुन्हेगार तपासण्यात आले. गोंदिया शहर ठाण्यातील सर्व हॉटेल, लॉज, बँकांचे एटीएम, मंदिर, पुतळे तपासून समन्स व वारंट तामील केले. गोंदियाच्या जयस्तंभ चौकात आणि भवानी चौकात नाकाबंदी करून वाहन तपासण्यात आली. काही वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या ऑपरेशन मुस्कान दरम्यान एका दारू विक्रेत्याला पकडण्यात आले. तर संशयित हालचाली करणाऱ्या एकाला पकडण्यात आले. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ हे उपक्रम पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, रामभाऊ व्होंडे, महादेव सीद, महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार, सहाय्यक फौजदार घनश्याम थेर व गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील ४५ कर्मचाऱ्यांनी पार पाडले.