शेंडा-कोयलारी : जवळच असलेल्या कोयलारी येथील प्रेमलाल लक्ष्मण कोहळे (५२) यांच्यावर शनिवारी पहाटे ५.३० वाजता अस्वलाने हल्ला करुन जखमी केले. ते आपला हरवलेला गोऱ्हा पाहण्यासाठी घराच्या वाडीमागील आवरीघाटाकडे गेले होते. घरच्या गाईचा गोऱ्हा रात्री घरी आला नाही म्हणून कोहळे हे त्याचा शोध घेण्यासाठी आवरी घाटाकडे गेले असता झुडपाआड असलेल्या अस्वलाने त्यांचेवर हल्ला करून त्याच्या उजव्या हाताचा चावा घेतला. आरडाओरड केल्यावर अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. मात्र रक्तस्त्राव झाल्याने चक्कर येवू लागली. अशातच कसाबसे घरापर्यंत पोहचू शकले. आपबिती सांगीतल्यावर काही इसमांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा येथे आणले. तेथील डॉ.के.आर.डुंबरे यांना औषधोपचार करून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. कोयलारी हे गाव जंगलाला लागून असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. चितळ, सांबर, अस्वल व रानडुकराच्या अतिरेकामुळे धान, गहू, ऊस यासारख्या शेतमालाचे मोठे नुकसान होतेतर हिस्त्र पशुपासून अधूनमधून मनुष्याला धोका होतच असतो. जखमी कोहळे हे मजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटूंबाचा सर्व भार त्याचेवरच आहे. त्यामुळे त्याच्या कुटूंबीयावर उपासमारीची पाळी येऊ शकते. सदर घटनेची माहिती वनविभागाचे क्षेत्रसहायक राघोर्ते यांना तत्काळ देण्यात आली असून चौकशी करून शासकीय मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी पिडीताच्या कुटूंबीयांना दिले. (वार्ताहर)
अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी
By admin | Published: February 12, 2017 12:44 AM