पळसगावात हळहळ : एकाच सरणावर सर्वांचे अंत्यसंस्कार लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : मध्यप्रदेश राज्यातील जमुनिया येथे अपघातात मृत्यू झालेल्या पळसगाव येथील मजूरांवर मुंडरीटोला येथील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात पळसगाव येथील सर्वाधिक सहा जणांचा मृत्यू झाल्याने अवघ्या गावात शोककळा पसरली होती. सायंकाळी ७ वाजता दरम्यान मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. तेंदूपत्ता तोडण्यासाठी मजूरांना घेऊन जात असताना वाहन नाल्यात पडल्याने मध्यरात्री २ वाजता दरम्यान मध्यप्रदेश राज्यातील जमुनिया येथे जिल्ह्यातील ११ मजूरांचा मृत्यू झाला. तर या अपघातात अन्य १५ मजूर जखमी झाले आहेत. या अपघातात मरण पावलेल्यामधील सर्वाधीक सहा जण तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथील असून त्यात बुधराम नत्थू रावत (४०), चुन्नीलाल दयाराम चौधरी (३५), नत्थू कुंवरलाल चौधरी (३०), रामलाल गणपत सरोते (४०), तुलाराम हरिचंद मोयरे (३५), प्रदीप भाऊराव हलबी यांचा समावेश आहे. अपघाताची ही बातमी कळताच अवघ्या गावात शोककळा पसरली होती. तर मृतांच्या घरांसमोर गावकरी एकत्र होऊन कुटुंबीयांचे सांत्वन करीत असतानाचे चित्र दिसून येत होते. सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान मृतदेह रूग्णवाहिकेत गावात आणले गेले. सर्वांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले व तेथूनच थेट मुंडरीटोला घाटावर नेले. सायंकाळी ७ वाजता दरम्यान घाटावर एकाच सरणावर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर बोथली येथील दोघा मृतांचे देह त्यांचा गावाला रवाना करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी घाटावर अवघे गाव जमले होते व मृतांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, पंचायत समिती सभापती कविता रंगारी यांच्यासह लगतच्या गावांतील सरपंच, अन्य पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. नाल्यातील पाण्यात बुडाल्याने मृत्यू मजुरांना घेऊन जात असलेले वाहन नाल्यात पडले. नाल्यात पाणी असल्याने पाण्यात बुडून या मजूरांचा मृत्यू झाला अन्यथा एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला नसता असे गावात आलेल्या मध्यप्रदेशच्या पोलिसांकडून कळले. नाल्यात पाणी होते व पाण्यात बुडाल्याने या मजूरांचा मृत्यू झाला.
साश्रू नयनांनी मृतांना दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 1:10 AM