लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जनआशीर्वाद यात्रेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभद्र शब्दांचा प्रयोग केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्वरित अटक करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी केली आहे. या प्रकरणाला घेऊन त्यांनी शहर पोलिसांत तक्रारही दिली आहे. तसेच नारायण यांच्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. २४) स्थानिक जयस्तंभ चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला. राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक असून नामदार राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेतही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात पत्रकारांसमोर अभद्र शब्दांचा वापर केला. या प्रकरणाचा शिवसेनेकडून राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच शिवहरे यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून एका जबाबदार पदावर राहताना कशा भाषेचा वापर करावा हे मंत्री विसरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राणे यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा संघटक सुनील लांजेवार व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
आमगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने आमगाव येथील शिवसैनिकांनी याचा मंगळवारी (दि.२४) तीव्र शब्दांत निषेध केला. नारायण राणे यांच्या पोस्टरला काळे फासून निषेध केला. राणे यांच्या विरोधात यावेळी नारेबाजी करण्यात आली. राणे यांना अटक करण्यात यावी यासाठी आमगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख कगेश राव, तालुका प्रमुख किशोर कावळे, शहर प्रमुख विकास शर्मा, तालुका उपप्रमुख विजय नागपुरे, अतुल चव्हाण, शुभम शर्मा, अल्ताफ कुरेशी, रियाज खान, जिल्हा संघटिका माया शिवणकर, शिवसेना महिला तालुका प्रमुख देवानंद तुरकर, इरफान तुरक, मारबते, संजू देशकर, सावन तिडके, वैभव पारधी, संजय बरय्या, सुनीता शेंडे, बेबी, विनिता भांडारकर यांची उपस्थिती होती.