बोंडगावदेवी : छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेवर अमाप प्रेम होते. त्यांचे विचार लोककल्याणकारी होते. त्यांचे एका मातीच्या धर्माच्या, पंथाच्या लोकांवरच प्रेम नव्हते, तर समस्त मानव जीवनावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. शिवाजी महाराजांच्या राजवाड्यातील दिवाणखान्यात विविध जाती, धर्मांचे लोक प्रमुख पदावर होते. त्यांच्या राजवाड्यात अंधश्रद्धा तसेच जातीयवादाचा स्पर्श होत नव्हता. सर्वधर्मसमभावाचे मूर्तिमंत प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता प्रा. डॉ. सविता बेदरकर यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या वतीने जवळील ग्राम सावरटोला येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती सभारंभात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गावचे नवनिर्वाचित सरपंच युवराज तरोणे, विश्वजित बागडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोणे, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. बेदरकर यांनी, शिवाजींच्या राज्यात महिलांचा मातेसमान आदर केला जात होता. शिवबाच्या चरित्रापासून आजच्या युवा पिढीने आदर्श घ्यावा. महाराजांनी मित्रांशी कदापि वैरत्व केले नाही. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. शिवाजींच्या राज्यात जातीयवादाला थारा नव्हता. त्यांच्या दिवाणखान्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर जिवाला जीव देणारे मुस्लीम धर्मीयांची नियुक्ती करण्यात आली होती. आज शिवजयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ढोल-ताशांच्या गजरात आपण जंगी मिरवणूक काढतो; परंतु शिवराय हे नाचून मोठे करण्यापेक्षा वाचून मोठे करा. शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेऊन नाचा, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे सांगितले.
याप्रसंगी स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य प्राप्त, नव्याने शासकीय नोकरीत रुजू झालेले, तसेच दहावी- बारावी परीक्षेत प्रावीण्यप्राप्त गावातील युवकांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक व संचालनकर्ते मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोणे यांनी आभार मानले.