गोंदिया : राज्यात कोरोना पुन्हा एकदा कहर करीत असतानाच जिल्ह्यातही बाधितांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. अशातच मध्य प्रदेश राज्यात जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असताना राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक आहे तशी सुरूच आहे. त्यामुळे गोंदिया आगारात असलेल्या शिवशाहीचाही नागपूरचा प्रवास सुरूच आहे. आगाराला ४ शिवशाही मिळाल्या असून नागपूरपर्यंत धावणाऱ्या या शिवशाहीला प्रवासी प्रतिसाद चांगलाच असतो. मात्र, कोरोनाचा कहर वाढत चालल्याने आता नागरिकांनी प्रवास टाळणे सुरू केले आहे. परिणामी एसटीची प्रवासी संख्या घटत चालली आहे. त्यात आता शिवशाहीतही २०-३० टक्के प्रवासीघट असल्याची माहिती आहे. परिणामी भरभरून धावणाऱ्या शिवशाहीत आता प्रवासी कमी होऊ लागले आहेत.
----------------------------------
सर्वच शिवशाही नागपूर मार्गावर
जिल्ह्याला ४ शिवशाही मिळाल्या असून या चारही गाड्या नागपूरपर्यंत धावतात. एसी असलेल्या या गाडीतून आरामदायक प्रवास होत असल्याने नागरिकांचा या गाडीकडे कल असतो. मात्र, आता कोरोना पुन्हा वाढत असल्याने नागरिक प्रवास टाळत असून याचा फटका शिवशाहीला बसत आहे.
---------------------------------
कोरोनामुळे उत्पन्नात घट
मध्यंतरी कोरोना नियंत्रणात आल्याने जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना कहर करीत असल्याने नागरिक प्रवास टाळत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे शिवशाहीतील २०-३० टक्के प्रवासीसंख्या घटली आहे. परिणामी उत्पन्नातही घट होत आहे.
-----------------------------------
-जिल्ह्यातील शिवशाही बसेसची संख्या - ४
- सध्या सुरू असलेल्या शिवशाही -४
------------------------------
आरामदायक प्रवासामुळे पसंती
शिवशाही ही एसी गाडी असून आरामदायक प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे शिवशाहीतून न थकता प्रवास होत असल्याने नागरिकांचा कल शिवशाही प्रवासाकडे असतो. परिणामी, आगाराला मिळालेल्या चारही शिवशाहीला नेहमीच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत शिवशाही तशीच धावत होती. मात्र, कोरोनाचे ग्रहण पुन्हा शिवशाहीला लागले आहे. आज शिवशाहीतील प्रवासीसंख्या घटताना दिसत आहे.
--------------------------------
कोट
जिल्ह्यात कोरोना पुन्हा उफाळताना दिसत असून यामुळे नागरिक आता प्रवास टाळत आहेत. याचा परिणाम शिवशाही तसेच लालपरीवरही पडत आहे. नागपूरपर्यंत धावणाऱ्या शिवशाहीला नेहमीच चांगला प्रतिसाद होता. मात्र, कोरोनामुळे आता पुन्हा प्रवासीसंख्येत घट होत आहे. यामुळे आगाराच्या उत्पन्नावरही याचा परिणाम पडत आहे.
- संजना पटले
आगारप्रमुख, गोंदिया.