गोंदिया : स्वस्त धान्य दुकानदारासंदर्भात काही तक्रार असल्यास किंवा दुसऱ्या गावी बदली अथवा कुठल्या कारणाने राहण्यासाठी जावे लागल्यास रेशन कार्डधारकांना पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नियमानुसार स्वस्त धान्य न देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या कटकटीला कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील तब्बल १६१३ रेशन कार्डधारकांनी दुकानदारच बदलून टाकला. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रेशनकार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ रेशन कार्डधारकांनी अधिक घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने रेशन कार्डधारकांना त्याची मदत झाली आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांना अथवा काही नागरिकांना दुसऱ्या गावात बदली किंवा रोजगारासाठी दुसऱ्या गावात राहण्यासाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना रेशनकार्ड पोर्टेबिलिटीमुळे आपले रेशनकार्ड त्या दुकानाशी जोडून स्वस्त धान्याची उचल करता येत आहे. त्यामुळे ही सुविधा निश्चितच रेशन कार्डधारकांसाठी सुविधेची ठरत आहे.
...............
शहरात जास्त बदल
- गोंदिया जिल्ह्यात रेशनकार्ड पोर्टेबिलिटीच्या सुविधेचा लाभ गोंदियात ९२१ रेशन कार्डधारकांनी घेतला आहे. म्हणजेच शहरी भागात जास्त बदल असून ग्रामीण भागात या सुविधेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.
- शहरी भागातील नागरिकांना रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधेची माहिती आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य वितरणात त्रास होत असल्यास ते त्वरित या सुविधेचा लाभ घेत आपले रेशनकार्ड दुसऱ्या दुकानाशी जोडून घेतात.
- ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांना या सुविधेची अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे ते या भानगडीत पडत नाहीत.
................
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा रोजगार गेला तर ग्रामीण भागातील हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची दोन वेळच्या जेवणासाठी मोठी अडचण झाली. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अंत्योदय व बीपीएल लाभार्थींना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. याचा जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ४४७ रेशन कार्डधारकांना लाभ मिळणार आहे.
............
काेणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार
आमगाव : ६८
अर्जुनी मोरगाव : ९४
देवरी १०७
गोंदिया ९२१
गोरेगाव १२
सडक अर्जुनी ८१
सालेकसा ३९
तिरोडा २९१
............................
बीपीएल : ७८,५१८
अंत्योदय : १,४४,५२९
केशरी : ४,८४२
...................
जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक : २,२३,४४७
किती जणांनी बदलला दुकानदार : १,६१३
.................