लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाजारात दुकानदारांकडून दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर मांडले जात असल्याने नागरिकांना वाहन ठेवण्यास अडचण होते. येथूनच वाहतुकीची डोकेदुखी सुरू होत असल्याने नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली होती. मात्र या मोहिमेला खंड पडताच दुकानदारांकडून पुन्हा दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आल्याचे दिसत आहे. बाजारातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत त्यात दुकानदार आपल्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. यामुळे नागरिकांना वाहन ठेवताना अडचण होते. परिणामी नागरिक खरेदीसाठी आले तर, रस्त्यावरच वाहन ठेऊन मोकळे होतात. येथूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते व जागोजागी ट्राफिक जामची समस्या उद्भवते. यामुळे नागिरकांना विनाकारण डोकेदुखी व त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वत: बघितला व अनुभवला आहे. यामुळेच त्यांनी नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेला संयुक्तरित्या मोहीम छेडून रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर ८ मार्च रोजी नगरपरिषद व वाहतूक नियंत्रण शाखेने मोहीम छेडली व रस्त्यावर असलेले दुकानदारांचे सामान व बोर्ड हटवून घेतले होते. त्यानंतर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्वत: उपस्थित राहून मोहीम छेडली होती. खास बात म्हणजे,नगरपरिषदेचे पथक किंवा वाहतूक पोलीस दिसल्यास दुकानदार तेवढ्यापुरते सामान व बोर्ड उचलून आत नेतात. मात्र त्यानंतर चित्र होते तेच दिसून येते. आता मोहिमेला सुमारे आठवड्याभराचा खंड पडला आहे. परिणामी दुकानदारांचे सामान व बोर्ड पुन्हा रस्त्यावर आल्याचे दिसत आहे.
आता थेट जप्तीची कारवाई - नगरपरिषद म्हणा की, वाहतूक नियंत्रण शाखा दोन्ही विभागांकडे मनुष्यबळ कमी असल्याने आहे तेवढ्या मनुष्यबळात ते काम करून घेत आहेत. त्यात होळीचा सण होता व अशात नागरिक व दुकानदारांनाही त्रास व त्यांचे नुकसान नको म्हणून या मोहिमेला खंड पडला. मात्र दुकानदारांनी त्याचा गैरफायदा घेत सामान व बोर्ड रस्त्यावर ठेवणे सुरू केले आहे. अशात आता मोहीम राबविल्यास मात्र काहीही न सांगता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
आतापर्यंत २ वेळा मोहीम राबविली असून दुकानदारांना समजावून सांगितले आहे. मात्र त्यानंतरही परिस्थिती तीच दिसून येत आहे. अशात आता मोहीम राबविल्यास काहीही न सांगता सामानाची जप्ती करून न्यायालयात केस पाठविली जाईल. त्यामुळे दुकानदारांनी सामान रस्त्यावर न ठेवता सहकार्य करावे. - दिनेश तायडे निरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा