गोरेगाव : शहरातील व्यापाऱ्यांनी वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत शहरातील सर्व प्रतिष्ठाने २० एप्रिलपासून दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ वाजता नियमित दुकाने उघडण्यात येतील व दुपारी १ वाजता सर्व प्रतिष्ठाने बद होणार आहेत.
शहरातील व्यापाऱ्यांची तहसील कार्यालयात सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, गोरेगावचे तहसीलदार सचिन गोस्वावी, पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे, खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी हर्षिला राणे यांची उपस्थिती होती. यावेळी शहरातील व्यापारी रेखलाल टेंभरे, विजय हरिणखेडे, प्रमोद जैन, टिटू जैन, राजधर रामटेके, मुन्ना लिल्हारे, रामभाऊ अगडे, जितू बिसेन, हरी मोटवानी, बादल टेंभुर्णीकर, देव गंगवानी, शोभेलाल भोंगाडे उपस्थित होते. २० एप्रिल रोजी दुपारी एक वाजेनंतर ज्यांची प्रतिष्ठाने सुरू राहतील त्या दुकान मालकावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. २० एप्रिलपासून शहरातील दवाखाने, मेडिकल स्टोअर, पेट्रोल पंप, शासकीय कार्यालये शासन निर्णयानुसार सुरू राहतील, तर बाकीची सर्व प्रतिष्ठाने दुपारी एक वाजेपासून बंद राहणार आहेत. कोरोनाचे संकट टळेपर्यंत दररोज सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती रेखलाल टेंभरे यांनी दिली.