आमगाव : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून धोका टळला नाही. जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमानुसार वेळेत दुकाने बंद होणे अपेक्षित असताना सरळ सरळ त्याची पायमल्ली होत असतांना आमगाव शहरात दिसून येत आहे.
सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी करण्यात आले. दुपारी चारच्यानंतर खुलेआम सुरूच असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. एकीकडे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका, आरोग्य विभाग, पोलीस विभागाने जीवाचे रान केले असता आमगाव तालुक्यात कोरोना आटोक्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने सकाळी सात ते चारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात यावीत, अशी नियमावली जारी केली असून शहरातील उदयोग व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना त्याचे काही देणे घेणे नाही. असे स्पष्ट दिसून येत आहे. पार्सलच्या नावाखाली खुलेआम दुकाने सुरू असून कारवाई करताना मात्र कोणी दिसत नाही.‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी गत पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट दिसत असताना पोलीस कारवाई का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर परिषद प्रशासन व पोलीस स्टेशन आमगाव यांनी मंगळवारी सुरू असलेल्या दुकांदारावर कारवाई सुरू केली होती.