गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी १५ एप्रिलपासून ब्रेक द चेन अंतर्गत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, यानंतरही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. विविध कारणे सांगून नागरिक घराबाहेर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता जीवनावश्यक वस्तू, रेस्टारंट यांच्या वेळेत बदल केला आहे. आता ही दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत सुरू राहणार आहेत.
मंगळवारपासून (दि. २०) या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी सोमवारी काढले आहेत. यात किराणा दुकाने, डेली निड्स, हॉटेल, रेस्टारंट हे सर्व सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू राहणार आहेत, तर पेट्रोलपंप, मेडिकल, आरोग्यविषयक बाबींना हा नियम लागू राहणार नाही. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. याच अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. हे नवीन आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.
.......
बँकाच्या वेळेत केला बदल
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असला तरी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच ग्रामीण बँकामध्ये ग्राहकांची गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी बँकेच्या वेळेतसुद्धा बदल करण्यात आला आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत आता बँक सुरू राहणार असून ग्राहकांना त्यांचे व्यवहार करता येणार आहेत.