गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आता सर्व दुकाने रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी शुक्रवारी (दि.१९) काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारी (दि.२३) रात्री १२ वाजतापासून करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाने कहर केला असतानाच आता जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांची गर्दी होऊ न देणे हे गरजेचे झाले आहे. अशात जिल्हाधिकारी मीना यांनी सर्व आस्थापना, व्यवसाय व दुकानांना रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारी (दि.२३) रात्री १२ वाजतापासून करावयाची असून उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई केली जाणार आहे.
---------------------
यांना वगळण्यात आले
या आदेशातून सर्व रुग्णालये, औषधविक्री दुकाने व वैद्यकीय सेवेशी संबंधित आस्थापना तसेच पेट्रोलपंप, दूध व दुग्धजन्य पदार्थ संकलन व विक्री केंद्र, औषधांची घरपोच सेवा करणाऱ्या आस्थापनांना वगळण्यात आले आहे. तसेच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा रात्री १० वाजतापर्यंत उपलब्ध राहणार असून हॉटेल-रेस्टॉरंटचे फक्त स्वयंपाकगृह रात्री १० वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहे.