गोंदिया : पाणी गरम करण्याच्या इलेक्ट्रिक केटलीला शॉटसर्किट होऊन आगीचा भडका उडाल्याची घटना शहरातील युनाइटेड हॉस्पिटलमध्ये बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजता दरम्यान घडली. वेळीच आग नियंत्रित करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरातील युनाइटेड हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांच्या कक्षात लागून असलेल्या इलेक्ट्रिक केटलीत अचानकच शॉटसर्किट झाला. बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेत माजी नगरसेवक सुनील तिवारी यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन पथकाने लगेच हॉस्पिटल गाठले. मात्र, तोपर्यंत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनीच आग नियंत्रणात आणली होती व त्यामुळे मोठा अनर्थ टळला.