सुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यातील नक्षलग्रस्त आदिवासी व जंगलव्याप्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गट ग्रामपंचायत बोदलकसा अंतर्गत येणाऱ्या बुचाटोला गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायतचे दुुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.
गट ग्रामपंचायत बोदलकसा अंतर्गत बुचाटोला येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. बुचाटोला हे गाव ३०० लोकसंख्या वस्तीचे असून बोदलकसा गट ग्रामपंचायतमध्ये येते. या गावात शासकीय दोन विहिरी व तीन बोअरवेल आहे. खाजगी लहान मोठ्या आठ विहिरी असून सुध्दा त्या विहिरीची पाण्याची पातळी कमी असल्याने गढूळ पाणी येते. गढूळ पाण्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून यामुळे साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणी पुरवठ्याची समस्या दूर करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.