गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातसुद्धा या आजाराचा शिरकाव झाला आहे. शहरातील खासगी ईएनटी तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञांकडे दररोज तीन रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या कोसाकोनाला झोल या टॅबलेट आणि एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचासुद्धा शहरातील औषध विक्रेत्यांकडे मागील आठवडाभरापासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन-तीन रुग्णांच्या शस्त्रक्रियादेखील रखडल्याची माहिती आहे. अतिरिक्त पैसे माेजून देखील ही औषधे मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. शहरातील चार ते पाच मुख्य औषधी दुकानांमध्ये या औषधांची मागणी केली, तसेच यासाठी अतिरिक्त पैसे मोजण्याची तयारी दाखवूनसुद्धा औषधे मिळाली आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिसवरील औषधे मिळत नसून, रुग्णांच्या नातेवाइकांची त्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे येथील औषध विक्रेत्यांनी सांगितले.
................
मागणी किती, पुरवठा किती?
सध्या गोंदिया येथे एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनची १५ व २० इंजेक्शनची मागणी होत आहे. मात्र, या इंजेक्शनचा महाराष्ट्रासह इतर राज्यांतसुद्धा तुटवडा असल्याने हे इंजेक्शन मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. शिवाय, कोसाकोनाला झोल या टॅबलेटचासुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे.
......
एका रुग्णाला लागतात ४५ डोस
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, हा आजार प्रामुख्याने नाकावाटे डोळ्यांत आणि डोळ्यांतून मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसताच त्वरित उपचार करावा लागतो. गंभीर रुग्णांना बरेचदा १४ दिवसांपर्यंत एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचे जवळपास ४५ डोस द्यावे लागतात. या एका इंजेक्शनची किमत ६ ते ८ हजार रुपये आहे.
...........
ओठ, नाक, जबड्याला बसतो फटका
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून स्टेराॅईडचा अतिवापर, अधिक काळ आयसीयूमध्ये राहणाऱ्यांना होतो. कोरोनातून बरे झालेल्या तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना या आजाराची लागण होते. या आजाराचा शिरकाव हा नाकावाटे होत असून, सायनस होऊन पुढे डोळ्यांत आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. यामुळे बरेचदा जबडा आणि डोळासुद्धा काढावा लागतो.
..............
इंजेक्शन औषधी मिळेना
- कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी या आजाराच्या रुग्णांची संख्या नाहीच्या बरोबरीत होते. एम्फोटिसिरीन बी या २० इंजेक्शनची मागणी पूर्वी वर्षाला होत होती. आता मात्र दररोज २० इंजेक्शनची मागणी होत आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा होत नाही.
- केवळ एम्फोटिसिरीन बी इंजेक्शनच नव्हे तर कोसाकोनाला झोल या टॅबलेटचासुद्धा मागील आठ दिवसांपासून तुटवडा आहे.
- म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने एम्फोटिसिरीन बी इंजेक्शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे येथील औषध विक्रेत्यांनी १ हजार इंजेक्शनची कंपनीकडे मागणी केली असून, अद्यापही पुरवठा झालेला नाही.
..............
काय म्हणतात तज्ज्ञ
काेरोनाच्या पहिल्या लाटेत म्युकरमायकोसिसचे एकही रुग्ण नव्हते. मात्र, दुसऱ्या लाटेत या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मी स्वत: दररोज दोन-तीन रुग्ण तपासत आहे. यात अनेकांना सर्जरी करण्याची गरज पडत आहे. यापूर्वी या आजाराचे वर्षातून एक-दोन रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णांनी लक्षणे दिसताच वेळीच काळजी घेत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- डॉ. संजय भगत, ईएनटी तज्ज्ञ
................
मागील दहा-बारा वर्षांत मी या आजाराचा एकही रुग्ण बघितला नव्हता. मात्र, मागील महिनाभरापासून या आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज दोन-तीन रुग्ण तपासणीसाठी क्लिनिकमध्ये येत आहेत. आजाराचा नाकावाटे डोळ्यांपर्यंत शिरकाव होतो. त्यामुळे रुग्णांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
डॉ. नीलेश जैन, नेत्ररोग तज्ज्ञ.
..............
कोरोनाबाधित व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे. स्टेरॉईडचा अतिवापर आणि उपचारादरम्यान आयसीयूमध्ये अधिक काळ असलेल्या रुग्णांना याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच उपचार केल्यास रुग्ण बरा होतो.
- डॉ. राहुल उईके, एम.डी. एम.एस. ओरल मॅक्सीलो सर्जन.