लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघे राज्य जेथे रक्ताच्या कमतरतेच्या समस्येने त्रस्त असतानाच शासनाकडून रक्तदान शिबिरावर भर दिला जात आहे. असे असतानाच येथील शासकीय रक्त केंद्रात ए,बी,एबी नेगेटिव्ह व एबी पॉझिव्व्ह ब्लड ग्रुपचा साठाच नसल्याचे शनिवारी (दि.१२) दिसून आले. तर अन्य ग्रुपच्या फक्त ५२ बॅग्सच असल्याची माहिती असल्याने जिल्ह्यातील रक्तकेंद्राची स्थिती ही फारशी बरी नसल्याचे दिसत आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. आता लॉकडाऊन नसल्यागत असतानाच नागरिकांमध्ये मात्र कोरोनाची दहशत आहेच. विशेष म्हणजे, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रक्तदानातूनही कोरोनाचा संसर्ग होणार अशी धारणा नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. परिणामी नागरिक रक्तदानासाठी घाबरत असल्याचे दिसत आहे. यामुळेच रक्तदान शिबिरांचे आयोजन घटले असून रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हेच कारण आहे की, सध्याच्या स्थितीत अवघ्या राज्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून राज्य शासनाकडून रक्तदानासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील नागरिकही उपचारासाठी येथेच येत असून अशात रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांना येथील शासकीय रक्तकेंद्रातूनच रक्त द्यावे लागते. अशात येथील रक्त केंद्रात रक्ताचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र असे असतानाही येथील शासकीय आजघडीला रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शनिवारी (दि.१२) शासकीय रक्त केंद्रातील रक्तसाठ्याची पाहणी केली असता त्यात ए, बी, एबी नेेगेटिव्ह तसेच एबी पॉझिटिव्ह ग्रुपचे रक्त नव्हते. यावरून शासकीय रक्त केद्रांतही रक्ताचा तुटवडा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
रक्त केंद्रात ५२ बॅग्सचा साठा शनिवारी येथील शासकीय रक्त केंद्रात फक्त ५२ बॅग्सचा साठा होता. यामध्ये ए पॉझिटिव्हच्या १९ बॅग्स, बी पॉझिटिव्हच्या १२ बॅग्स, ओ पॉझिटिव्हच्या २- बॅग्स तर ओ नेगेटिव्ह ग्रुपची फक्त १ बॅग होती. मात्र हा साठा जिल्ह्यातील स्थिती बघता अत्यंत कमी असल्याने यात वाढ होण्याची गरज आहे. याकरिताच रक्त केंद्राकडून रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्त संकलनावर जास्त जोर दिला जात आहे. रक्तदान शिबिर हेच रक्तसाठा वाढविण्याचे एकमात्र माध्यम आहे. अशात नागरिकांनीही आता रक्तदानासाठी पुढे यावे असे रक्त केंद्र प्रमुख डॉ. संजय चव्हाण व जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांनी सांगीतले.