गोंदिया : वृद्धाला गुप्तधनातून करोडपती होण्याचे स्वप्न दाखवून स्वत: लाखोपती होण्याची मनशा पूर्ण करणाऱ्या मांत्रीकासह दोघांवर देवरी पोलिसांनी अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ८० वर्षाच्या वृद्धाला गुप्तधनातून करोडपती होशील असे आमिष देऊन त्याच्याकडून महिनाभरात तब्बल ७ लाख लुटले. ही घटना देवरी तालुक्याच्या खुर्शीपार येथे घडली.
देवरी तालुक्याच्या खुर्शीपार येथील ग्यानिराम सादाराम उके (८०) यांना गुडघ्याचा त्रास असल्याने गुड्याचा त्रास नष्ट होणारी औषधी कुठे मिळेल असे नातेवाईकंना विचारले असता नातेवाईकांनी या मांत्रीकाचा नंबर दिला. नातेवाईकांच्या माध्यमातून त्या मांत्रीकासोबत झालेली ओळख चांगलीच झाली. त्याच्याकडून ग्यानिराम उके यांनी गुडघा दुखीची औषधी घेतली. त्यात त्यांना आरामही मिळाला. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपी गोपाल वैद्य (५५) रा. पारडीसिंगा ता. काटोल जि. नागपूर याने आपला व्हीजीटींग कार्ड सुध्दा त्यांना दिला होता.
औषधी घेण्यासाठी गेलेल्या ग्यानिराम उके यांना आरोपीने तुझ्या घरी गुप्तधन आहे. ते गुप्तधन तुला काढून देतो, त्यासाठी जादूटोणा करणारा एक माझा मित्र आणतो असे त्याने सांगत तू करोडपती होशील असे आमिष दिले. त्याच्यावर विश्वास ठेवत खुर्शीपार येथील ग्यानीराम सदाराम उके (८०) यांनी ते गुप्तधन काढण्यासाठी परवानगी दिली. आरोपींनी त्यांच्या जवळून ७ लाख रूपये लुटून गुप्त धनाच्या नावावर जमीनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात दोन आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ३ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चारण करण्याचे अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहेत.
गुप्तधनाच्या नावावर जमीनीतून काढल्या २८ मूर्ती व २ झाकण
गुप्तधन जमीनीतून काढण्याच्या नावावर त्यांच्या घरात खड्डा खोदून बनवाबनवी करून गुप्तधन काढण्याच्या नावावर त्यांच्या घरी खोदलेल्या खड्यात एका तांब्याच्या लोट्यात १५ पितळेच्या लहान मूर्ती, एक बालकृष्णाची मूर्ती, एका तांच्याच्या हंड्यात गणेशच्या ५ मूर्ती, देवीच्या ७ मूर्ती, दोन पितळेचे झाकण काढण्यात आले. आरोपींनी नजर चुकवून ते साहित्य जमीनीत गाडून त्यांना जमीनीतून काढत असल्याची बनवाबनवी करण्यात आली.महिनाभरापासून सुरू होता प्रकार
सडक-अर्जुनी तालुक्याच्या खुर्शीपार येथील ग्यानिराम सदाराम उके (८०) यांच्या घरून गुप्तधन काढण्याची प्रक्रिया ८ सप्टेंबर २०२३ पासून १३ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान करण्यात आली. तब्बल महिनाभरापासून मांत्रीकाच्या माध्यमातून पूजाअर्चा करून खोदकाम करणे वेगवेगळ्या विधी करण्याचे काम मांत्रीकाने केले.