आमगाव : दरवर्षी नागपंचमीला पावसाची रिमझिम सुरू असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे; परंतु या नागपंचमीला श्रावणसरी बरसल्याच नाहीत. साेमवार (दि. ९)पासून श्रावण महिना सुरू झाला तरी अद्याप जिल्ह्यात श्रावण सरी बसरल्या नाहीत. तालुक्याला अजूनही श्रावणसरींची प्रतीक्षा आहे.
श्रावणात ऊन-पावसाचा खेळ रंगतो. ढगांच्या आडून डोकावणाऱ्या सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्याचे मनोहर दृश्य मन मोहवून टाकते. तृणांवरील पाण्याचे बिंदू मोत्यांसारखे चकाकतात. मात्र यंदा अद्याप तरी हे सृष्टीचे असे विलोभनीय रूप पाहायला मिळालेले नाही. सर्वचजण श्रावणसरींची वाट पाहत आहेत. नागपंचमीला पावसाची झडी राहते, हा नेहमीचाच अनुभव आहे. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. रोज आकाशात काळ्या ढगांचा समूह पाहायला मिळतो. त्यामुळे श्रावणसरींची अपेक्षाही फोल ठरते. श्रावणात धो-धाे पाऊस कोसळतो अन् काही वेळात ऊन पडते. असे दृश्य यंदाच्या श्रावण महिन्यात अजूनही डोळ्यांना दिसले नाही. बळिराजाही केव्हा वरुणराजाची कृपा होते, याचीच वाट बघत आहे; कारण जमिनीच्या कुशीतून डोके वर काढलेल्या कोंबांना जिवंत राहण्यासाठी श्रावणसरींच्या गारव्याची आवश्यकता आहे.
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे
निसर्गकवी बालकवी यांच्या या काव्यानुसार श्रावणात पाऊस आणि ऊन लपाछपी खेळत असताना क्षणात सरसर पाऊस पडतो तर क्षणात पुन्हा पिवळे ऊन पडते; परंतु असे दृश्य या श्रावणात बघावयास मिळाले नाही. पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी तापमान हे ३१ अंशांवर पोहोचले आहे. उकाडा असह्य होत आहे. त्यामुळे पुन्हा गार हवा हवीहवीशी वाटू लागली आहे.