गोंदिया : मंगळवार (दि.२६) रोजी पुणे येथे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी सोमवार (दि.२५) रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील हे पुण्याला गेले. तर याच दिवशी पोळा सण असल्यामुळे कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे दिवसभार या कार्यालयात काही महिला कर्मचारी वगळता शुकशुकाट दिसत होता. सदर कार्यालयाला सोमवारी भेट दिली असता केवळ तीन ते चार महिला कर्मचारीच कार्यालयात उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांना माहिती विचारले असता तुम्ही परवा या, असे सांगून त्यासुद्धा घरी निघण्याच्या तयारीतच असल्याचे दिसून आले. पुरूष कर्मचारी तर कार्यालयात उपस्थितच नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींग असल्यामुळे एक अधिकारी तिथे गेले होते. याशिवाय कर्मचाऱ्यांची सर्वच टेबले व खुर्च्या रिक्त होत्या. एखाद्या कामानिमित्त कुणी या कार्यालयात आले तर त्यांना आल्या पावली परत गेल्याशिवाय गत्यंतर नव्हते. उपस्थित असलेल्या महिला कर्मचारी माहिती देण्यास तयार नव्हत्या. तर माहिती देवू शकणारे पुरूष कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिक्त होत्या. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांच्या स्टेनोची खुर्चीसुद्धा रिक्तच होती. एकीकडे जिल्हा कृषी अधीक्षक सभेसाठी पुणेला गेले. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना सण साजरा करण्यासाठी ही उत्तम संधी चालून आल्यासारखे वाटत होते. त्यामुळे सर्व कर्मचारी दुपारनंतर आपल्या कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आढळले. यामुळे कृषी अधीक्षकांचे कार्यालय वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा बेमुदत संप संपला. तसेच सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सर्वांना कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु पोळा सण व कृषी अधीक्षकच नसल्यामुळे जणू सणाचा आनंद घेण्याची पर्वणीच मिळाल्याचे कर्मचाऱ्यांना वाटत होते. (प्रतिनिधी)
कृषी अधीक्षक कार्यालयात शुकशुकाट
By admin | Published: August 26, 2014 12:03 AM