गोंदिया : राज्यातील पाच जिल्ह्यांत कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने सोमवारपासून (दि.२८) पुन्हा जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या निर्बंधानुसार सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत, तर आठवडी बाजार आणि काेचिंग क्लासेस पुन्हा बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शुक्रवारी (दि.२५) काढला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने आणि पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या आत असल्याने जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच टप्प्यात समावेश होता. त्यामुळे मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यातील उद्योग धंद्याची गाडी रुळावर आली होती. सर्वच व्यवहार जवळपास सुरळीतपणे सुरू झाले होते. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र, राज्यातील पाच जिल्ह्यांत कोरोनाच्या डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सोमवारपासून (दि.२८) पुन्हा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीत सुरू राहणार आहेत, तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत.
............
जिल्ह्यात काय राहणार सुरू
- जीवनावश्यक व इतर सर्वच दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार सुरू.
- रेस्टाॅरंट, हॉटेल, खाणावळी यांना पार्सल सुविधेची मुभा.
- सर्व मैदान, बागेत पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत व्यायाम करणे आणि फिरण्यास मुभा.
- सर्व खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने राहणार सुरू.
- सर्व सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची अट.
- विवाह सोहळ्यास ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी.
- अंत्यविधीस २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी.
- सर्व प्रकारची बांधकामे दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार.
- कृषीविषयक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील.
- जीम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
- सार्वजनिक प्रवासी वाहतूक, बसेस पूर्ण क्षमतेने राहतील सुरू.
- आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक राहणार सुरू.
- मोठे व लघु उद्योग राहणार सुरू.
......................
काय राहणार बंद
- सर्व कोचिंग क्लासेस, संगणक क्लासेस, शासकीय व निमशासकीय प्रशिक्षण केंद्रे.
- आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद.
- शाॅपिंग माॅल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स.
..........................
नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण वाढल्याने राज्यात सोमवारपासून नवीन निर्बंध लागू करण्यात येत आहेत. या नियमांचे उल्लघंन केल्यास साथरोग प्रतिबंध कायदा १९८७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
................