गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध लागू करीत दुकाने रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेश काढले आहेत. मंगळवारी (दि. २३) रात्री १२ वाजल्यापासून हे आदेश लागू करावयाचे असल्याने बुधवारपासून (दि. २४) जिल्ह्यातील सर्वच दुकानांचे शटर रात्री ८ वाजता बंद होणार आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला असून, त्यात राज्यातील परिस्थिती अधिक गंभीर दिसून येत आहे. राज्याप्रमाणेच आता जिल्ह्यातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ८ वाजता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारपासून (दि. २३) करावयाची असून, रात्री १२ वाजल्यापासून हे आदेश लागू होणार आहेत. यामुळे बुधवारपासून (दि. २३) रात्री ८ वाजता जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे शटर खाली करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यात रविवारी तब्बल ९२ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असल्याचे दिसत आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याचे मागील वर्षी दिसून आले. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने व आस्थापनांची वेळ कमी करीत रात्री ८ वाजता सर्व दुकाने व आस्थापना बंद करण्याचे आदेश काढले आहेत.
-------------------------------
...यांना वगळण्यात आले आहे
रात्री ८ वाजता दुकाने व आस्थापनांचे शटर खाली पाडावयाचे असतानाच पेट्रोल पंप, दूध व दुग्धजन्य पदार्थ संकलन व विक्री, औषधांची घरपोच सुविधा देणाऱ्यांना हे निर्बंध लागू होणार नाहीत. तसेच खाद्य पदार्थांची घरपोच सेवा रात्री १० वाजतापर्यंत उपलब्ध राहणार असल्याने हॉटेल - रेस्टॉरंटचे फक्त स्वयंपाक गृह रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.