सालेकसा : जन्मापासून सिकलसेल एनिमियाच्या आजाराने ग्रस्त असलेला कोटजंभुरा येथील २० वर्षीय तरुण प्रदीप धर्मदास मेश्राम याला दुर्धर आजारामुळे अर्ध्यावरच आपला जीवन प्रवास संपवावा लागला. प्रदीप आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या निधनाने आई-वडील पोरके झाले आहे.
प्रदीपचा सोमवारी (दि. २१) उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कोटजमुरा येथील मेश्राम कुटुंबीय मोलमजुरी व वेळ मिळाल्यास विळ्या वळण्याचे काम करून जीवन जगतात. धर्मदास मेश्राम (५४) आणि ललीता मेश्राम (५०) या दाम्पत्याला दोन अपत्ये झाली होती. त्यात मुलीचा बालपणीच सिकलसेल मृत्यू झाला. प्रदीपने सिकलसेलचा त्रास भोगत वयाचे २० वर्ष काढले; पण अखेर त्याने मृत्यूने कवटाळले. तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार हाेता. आई-वडील मोलमजुरी करीत त्याला शिक्षण घेण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार मदत करीत होते. परंतु सिकलसेल एनिमियासारख्या दुर्धर आजारासाठी औषधोपचार पुरविण्यासाठी नेहमी मागे पडले, त्याला पोषक आहारसुद्धा लाभले नाही. एकुलता एक मुलाच्या मृत्यूने मेश्राम दाम्पत्याचा पुढच्या जीवनाची वाट खडतर झाली आहे.