नरेश रहिलेलाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोलीस प्रशासन जीपीएससारख्या प्रगत प्रणालीशी आपली हेल्पलाइन जोडत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला ‘क्विक रिस्पॉन्स’ मिळून ती समस्या कमीत कमी वेळेत सोडविण्यासाठी ११२ ही नवी हेल्पलाइन पोलीस दल सुरू करणार आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत डायल ११२चे वाहन उपलब्ध झाले आहेत. सध्या २७ वाहने गोंदिया पोलीस दलाला मिळाले आहेत. पोलीस विभागाच्या मदतीसाठी १००या टोलफ्री क्रमांकांवर संपर्क साधल्यास तत्काळ मदत पुरविली जाते. मात्र, कधी मदत मिळण्यास विलंब झाल्यास पोलीस विभागावरच ताशेरे ओढले जायचे. नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा उंचविण्यासोबतच सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा तातडीने करणे सोयीचे व्हावे म्हणून केंद्र सरकारने सर्व टोल फ्री क्रमांक आता एकाच क्रमांकावर करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टीम या नावाने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा ही कंपनी या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. मुंबई आणि नागपूर येथे नियंत्रण कक्ष (पीसीसी) राहणार आहे. जिल्हास्तरावर इमरजन्सी रिस्पॉन्स व्हिकलचे (ईआरव्ही) स्वतंत्र युनिट स्थापन करण्यात आले आहे. यासाठी गोंदिया पोलीस दलात २७ वाहने दाखल झाली आहेत. आणखी किती वाहने येतील याची माहिती गोंदिया पोलिसांना नाही. मिळालेल्या वाहनात जीपीएस सिस्टीमसह अत्याधुनिक सुविधा आहेत. प्राथमिक स्तरावर सर्व प्रक्रिया घटनास्थळी दाखल झाल्यानंतर केल्या जाणार आहेत. याचा फायदा प्रकरणांचा निपटारा करण्यास होणार आहे. यामुळे समाजातील गरजूंना या माध्यमातून तत्काळ मदत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे. नागरिकांना या टोल फ्री हेल्पलाइनमुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे.
कॉल येताच कळणार लोकेशनही सेवा जीपीएस यंत्रणेद्वारा कार्यान्वित आहे. आपात्कालीन परिस्थितीतील कोणत्याही व्यक्तीने ११२ हा क्रमांक डायल केल्यास तो फोन तत्काळ मुंबई आणि नागपुरातील कॉल सेंटरला जाईल. तेथून घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटना घडलेल्या परिसरात पोलिसांच्या जीपीएस व्हॅनमधील लॅपटॉपवर तसेच बॉमटाॅम जीपीएस यंत्रणा असलेल्या दुचाकीवरील मार्शलला मिळणार आहे. त्यामुळे मार्शल लगेच घटनास्थळी पोहचून मदत करणार आहे.
पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा- सर्वसामान्य नागरिकांनी डायल ११२ क्रमांकाशी संपर्क साधल्यानंतर थेट नागपूर येथील नियंत्रण कक्षातील कर्मचारी संवाद साधतील. या संवादात ठिकाण व समस्येचे स्वरूप आणि नाव नोंदविले जाईल. त्यानंतर कंट्राेलरुममधून थेट त्या क्षेत्रातील इमरजन्सी रिस्पॉन्स व्हेईकल युनिटमधील कर्मचाऱ्यांशी काही सेकंदात संपर्क साधला जाईल. - पोलीस अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी जाऊन मदत करतील. कंट्राेल रुम ते लोकल कनेक्शनमुळे तक्रारींचा निपटारा होण्यास किंवा सर्वसामान्यांना मदत मिळणे सहज शक्य होणार आहे.
२७ चारचाकी, ०० दुचाकीडायल ११२साठी जिल्हा पोलीस दलात एकूण २७ चारचाकी दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध होणार आहे. दुचाकी किती येतील यासंदर्भात आता काही माहिती नाही.
२५० पोलिसांना विशेष प्रशिक्षणयेत्या काही दिवसांतच डायल ११२ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेविषयीचे ज्ञान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील तब्बल २५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्वीनी कदम यांनी दिली आहे. प्रशिक्षणात संगणक व वायरलेसचे ज्ञान देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
गोंदिया पोलीस दलाला ११२ची २७ वाहने मिळालेली आहेत. आणखी किती वाहने मिळणार हे पुढे काही सूचना आल्यावर कळेल. ही यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होईल, या यंत्रणेमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारी आल्यास तत्काळ मदत मिळणार आहे.तेजस्वीनी कदम, पोलीस उपअधीक्षक (गृह) गोंदिया