गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ सातत्याने खाली उतरता दिसत असतानाच कधी तीन अंकी नोंदविण्यात येत असलेली कोरोना बाधितांची आकडेवारी आता एक अंकी होत आहे. गुरुवारी (दि.२१) जिल्ह्यात ८ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली असतानाच त्यापेक्षा दुप्पट म्हणजेच १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता जिल्ह्यात १५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८८ टक्क्यांवर आले आहे. यामुळे आता लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होणार असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या ८ रुग्णांत गोंदिया तालुक्यातील ५, गोरेगाव १, आमगाव १ व सडक-अर्जुनी तालुक्यातील १ रुग्ण आहे. कोरोनावर मात करणाऱ्या १६ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १०, तिरोडा ४, गोरेगाव १ तर आमगाव तालुक्यातील १ रुग्ण आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची आकडेवारी १४०७४ एवढी असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १३७४० झाली आहे. जिल्ह्यात १५३ क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८४, तिरोडा १२, गोरेगाव ६, आमगाव २३, सालेकसा १२, देवरी ५, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव ४ तर इतर जिल्हा व राज्यातील ४ रुग्ण आहेत.
-----------------------
जिल्ह्यात १२४६०९ कोरोना चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत १२४६०९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६०७१८ आरटी-पीसीआर असून, त्यात ८३०३ पॉझिटिव्ह तर ४९१६४ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रकारे ६३८९१ रॅपिड ॲन्टीजन चाचण्या असून, ६०६० पॉझिटिव्ह तर ५७८३१ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. शिवाय ३४ अहवालांचा अहवाल संशयीत आहे.
--------------------------------------
७१ रुग्ण घरीच अलगीकरणात
जिल्ह्यात आता ७१ रुग्ण घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४३, तिरोडा ५, गोरेगाव २, आमगाव १०, सालेकसा ६, देवरी २, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत.