n लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे, मात्र अजुनही या संस्थेत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात अडकले आह. अशात तात्काळ धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासन व महामंडळाने परवानगी दयावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.परिसरात आणि संस्थेंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी धान कापणी, मळणी आणि चुरणी सुरु केली आहे. मात्र हे धान विक्री करण्यासाठी शासनाच्या सहकारी संस्था व महामंडळाने अद्याप धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील वर्षी सातबारावर संस्थांनी धान खरेदी केली. तर अतिरिक्त धान खरेदी म्हणजे व्यापाऱ्यांचेही धान शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर विकले असे दिसून आले आहे. याच अटीवर महामंडळ व शासन लक्ष देऊन असून याच्या चौकशीचे आदेश काढून तपासणी सुरु असल्यामुळेही धान खरेदीची परवानगी देत नाही. या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी आदिवासी संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची सभा झाली व आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि आमदार सहेषराम कोरोटे यांच्याकडे साकडे घातले होते, पण यावर काहीच निर्णय शासनाकडून झालेला दिसत नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाचे राज्याचे संचालक भरत दुधनाग यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. परंतू संस्थांच्या या प्रकारामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने यावर उपाय शोधून शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी मार्ग मोकळा करुन द्यावा अशी मागणी बाराभाटी, येरंडी, डोंगरगाव, कवठा, बोळदे, कुंभीटोला, ब्राह्मणटोला, सुकळी खैरी दाभना चापटी अशा १३ गावांतील शेतकऱ्यांची मागणी आहे.
विना सातबाराशिवाय संस्था धान खरेदी करत नाही. धान खरेदी सुरु करण्यासाठी आदेश दयावे. - तुलाराम शाहू मारगाये अध्यक्ष, आदिवासी विविध सहकारी संस्था, बाराभाटी
आमची बैठक झाली शासन विचार मंथन करीत आहे, शेतकऱ्यांच नुकसान होऊ देणार नाही. धान खरेदी केंद्र सुरु होतील. - मनोहर चंद्रिकापुरे , आमदार, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र
आमच्या चर्चा सुरु सून सहकार मंत्री यांच्यासोबतही बैठक आहे, लवकरच तोडगा काढणार आहोत.- सहषराम कोरोटे, आमदार