बाराभाटी : परिसरात रोजगार हमी योजनेंतर्गत शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाटाचे काम करून जवळपास १ महिना झाला. पण, अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत, अशी येरंडी येथील मजुरांची ओरड असून, पैसे जमा करा, अशी मागणी ते करीत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने अनेक भागात मजुरांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत मजुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे रोजगार नाही तर सरकारने महागाई वाढवली, अशा वेळेस गरिबांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होतो. अशात महिना लोटूनही पाटाच्या कामाचे पैसे मजुरांच्या खात्यावर जमा झालेले नाही. रोजगार हमीचे काम अर्जुनी - मोरगाव पंचायत समितीअंतर्गत पूर्ण झाले. त्वरित पैसे जमा न झाल्यास पालकमंत्री, रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा मजुरांना दिला आहे.