बाराभाटी : मानव पाण्याविना कसा जगेल, पाण्याशिवाय माणसाचे काहीच होत नाही. अशाही काळात धमदीटोला गावात पिण्याच्या पाण्याची योग्य सोयच नाही. गावात एकच बोअरवेल असून, त्या बोअरवेलचे पाणी हे गढूळच येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.
धमदीटोला गावात मागील अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या कायम आहे. गट ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे लक्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय केली नाही. गावात आदिवासी समाजातील नागरिक अधिक आहेत. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनिधींचे सुद्धा या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. गावातील एकमेव बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्यामुळे महिलांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून पाणी आणावे लागत आहे, तर कधी शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पाण्याची सोय करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
.........
टँकरने पाणीपुरवठा करा
मागील काही दिवसांपासून धमदीटोला येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. गावात एकमेव असलेल्या बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
....
ग्रामपंचायतीने आमच्या सर्व समस्या दूर कराव्या
या गावात अनेक समस्या प्रलंबित आहेत. आदिवासी समाजाचा फायदा घेऊ नये. भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल न करता गावकऱ्यांना किमान मूलभूत सुविधा तरी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी येथील गावकऱ्यांची मागणी आहे.
.......
अनेक उन्हाळे व पावसाळे पाहिले; पण शुद्ध पाण्याचा पुरवठा अद्यापही करण्यात येत नाही. गावातील पाणी पुरवठ्याच्या समस्येची कुणीच दखल घेतली नाही.
- अरुण उईके, नागरिक धमदीटोला
.....
ग्रामपंचायत लक्ष देत नाही. योजनांचा लाभही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे; पण प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही.
-राजाराम नैताम, गृहस्थ धमदीटोला