: कृषी विभागाचे दुर्लक्ष
अर्जुनी मोरगाव : कृषी विभागाने ग्रामपंचायतकडे मजुरांची मागणी केली. ग्रामपंचायतने जॉबकार्ड असलेल्या मजुरांना नमुना चार दिला. मात्र दीड महिन्यांपासून कृषी विभाग मंजूर असलेल्या भातखाचराचे काम करीत नसल्याचा दाभना ग्रामवासीयांनी आरोप केला आहे.
ग्राम दाभना येथे भातखाचराचे काम मंजूर असून यासाठी नमुना चारवर असलेले ५० जॉबकार्ड धारक मजूर द्यावे असे पत्र कृषी सहाय्यक मसराम यांनी ग्रामपंचायतला ३१ मार्च रोजी दिले. ग्रामपंचायतने रोजगार सेवक मार्फत मजुरांची यादी मसराम यांना दिली. मात्र दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही काम सुरू करण्यात आले नाही. सध्या कोरोनाचे संकट सुरू आहे. ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नाही. उदरनिर्वाहासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मग्रारोहयोची कामे सुरू होतात मात्र कोरोनाच्या संकटामुळे गावात कामे नाहीत. उलट याच परिस्थितीत शेजारच्या गावात काम सुरू आहे. मजुरांनी ग्रामपंचायतकडे कामासाठी तगादा लावला आहे. मजुरांच्या आशा पल्लवित करणारा कृषी विभाग मजुरांना काम देईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.