गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधित होण्याच्या प्रमाणासोबतच मृत्यूसंख्याही झपाट्याने वाढत आहे. यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे. परंतु लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे व तळहातावर कमावून खाणाऱ्यांचे हाल होत असल्याने सरकारने वीकेंड लॉकडाऊन करण्याचे ठरविले. त्यानुसार शनिवार व रविवार हे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन म्हणून पाळले गेले. या दोन दिवसांत दुकाने व प्रतिष्ठाने बंद होती. मात्र अनेक लोक रस्त्यावर आले होते. अनेक लोक वाहनाने फिरताना विनाकारण दिसले. यांना रस्त्यावर असणाऱ्या पाेलिसांनी विचारणा केल्यावर अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिलीत. सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व गरजवंतांना जाता येईल असे सुचविले होते. त्यामुळे विनाकारण फिरणारेही कोणते ना कोणते कारण पुढे करून दोन्ही दिवस रस्त्याने फिरताना दिसले. या दोन दिवसात गोंदिया जिल्ह्यात ९६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दोन दिवसांच्या कारवाईत ४८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. फिजिकल डिस्टन्सिंचे तीन तर विना मास्कचे ९३ प्रकरणे समोर आले. या प्रकरणात ५०० रूपये प्रमाणे प्रत्येकाला दंड आकारण्यात आला आहे.
......
शनिवारी झालेल्या कारवाया
शनिवारी (दि.१०) विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या कारवायांत विनामास्कच्या ४५ तर फिजिकल डिस्टन्सिंगची एक अशा ४६ कारवाया करण्यात आल्या. त्यांना प्रत्येकी ५०० रूपये प्रमाणे २२ हजार ५०० रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
.....
रविवारी झालेल्या कारवाया
रविवारी (दि.११) विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या कारवायांत विनामास्कच्या ४८ तर फिजिकल डिस्टन्सिंगच्या दोन अशा ५० कारवाया करण्यात आल्या. त्यांना प्रत्येकी ५०० रूपये प्रमाणे २५ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
........
बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच
विकेंड लॉकडाऊन दरम्यानही अनेक नागरिक घरातून बाहेर पडले. या दरम्यान बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी त्यांना पकडले असता बहुतांश लोकांनी मेडीकलमध्ये जात असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर डॉक्टरांकडे जात असल्याचे काहींनी सांगीतले. काहींनी भाजी तर काहींनी फळे घ्यायला जात असल्याचे ही सांगितले.