सुरेंद्र भांडारकर
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिक आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पण, अद्यापही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे “साहेब, अजून किती दिवस खड्ड्यांतूनच प्रवास करायचा?” असा सवाल गावकरी उपस्थित करीत आहेत.
घोगरा ते देव्हाळा हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, यात ठिकठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. घोगरा ते पाटीलटोला व्हाया नवेगाव या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. पण, अल्पावधीतच या रस्त्याचीसुद्धा दुरवस्था झाली. पाटीलटोला येथे झांझरिया कंपनी आहे. या कंपनीत घोगरा येथील २०० मजूर कामावर जात असतात. त्यामुळे रात्री-बेरात्री कामावर जातेवेळी तारेवरची कसरत करावी लागते. नवेगाव पाटीलटोला गावावरून हा रस्ता नवेगाव (खुर्द) येथे जोडला आहे. या रस्त्यांनी अनेक युवक अदानी तिरोडा येथे कामावर जात असतात. नवेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला संतोषी माता मंदिर आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात. नवेगाव ते पाटीलटोला या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून तळी तयार झाली आहेत.
........
शालेय विद्यार्थ्यांना बसतोय फटका
येडमाकोट ते केसलवाडा हा रस्ता जीर्ण झालेला असून, गिट्टी व मुरूम रस्त्यांच्या कडेला पडलेले दिसत आहे. येडमाकोट फाटा येथे प्रवासी निवारा आहे. या ठिकाणाहून गोंदिया ते नागपूरकडे एस.टी. बसेस धावत असतात. केसलवाडा येथील विद्यार्थी तुमसर ते तिरोडा येथे महाविद्यालयात जातात. पण, या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे.
......
वर्षभरातच उखडतात रस्ते
नवेगाव ते मनोरा या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. पण, हा रस्ता या वेळी जीर्ण झाला असून डांबर व गिट्टीचा पत्ताच नाही. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत. मनोरावासी मुंडीकोटा हे गाव व्यापारपेठ असल्यामुळे देवाण-घेवाण करण्यासाठी मनोरा येथील नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. मात्र रस्ता खराब असल्याने त्यांनासुद्धा त्रास सहन करावा लागतो. वर्षभरातच रस्ते खराब होत असल्याने बांधकामावर शंका निर्माण होत आहे.