गोंदिया : शिस्त, गस्त आणि बंदोबस्तात मश्गूल राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावात मुकाट्याने काम करावे लागते. साहेबाने आपली साहेबगिरी दाखवून अपमान केला किंवा कोणत्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली तरीही त्याची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षात पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या पोलीस हेल्पलाईनमध्ये केली जात नाही. आपण तक्रार केल्यास वरिष्ठांकडून कारवाई केली जात नाही. उलट आपल्याला टार्गेट करतील म्हणून पोलीस कर्मचारी वरिष्ठांची तक्रार करीत नाही. एकतर मुकाट्याने अत्याचार सहन करतात नाही तर अधिकाऱ्याचा त्रास जास्तच झाला तर सीक (रजा) घेऊन पोलीस सुट्टीवर जातात. परंतु वरिष्ठांची तक्रार करून आपल्याच मागे फटाके कशाला असा मानस बाळगून मुकाट्याने काम करतात.
........................
कुणाला रजा नाही तर कुणाला हीन वागणूक
-गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देत असतात. त्याची तक्रार ज्या पोलीस कर्मचाऱ्यांने त्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली तर आपल्यालाच टार्गेट करतील, असे त्यांना वाटते.
- पोलिस विभागात मनुष्यबळ कमी असल्यामुळे पोलिसांना हक्काच्या सुट्या वारंवार दिल्या जात नाही. बहुतांशवेळी साहेबांनी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी बोलावले तर त्याची बदली रजा देत नाहीत.
- साहेबांनी एखाद्याला टार्गेट केले तर त्याचे कुठे चुकते का फक्त हेच पाहून वारंवार त्याला टॉर्चर केले जाते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या पोलीस कर्मचारी खचून जात आहेत.
.................
हेल्पलाईनला तक्रार न होता पोलीस अधीक्षकांकडे काही तक्रारी
गोंदिया जिल्ह्यात हेल्पलाईनला तक्रार न होता पोलीस अधीक्षकांकडे काही तक्रारी होतात. पोलीस अधीक्षकांकडे आलेल्या तक्रारींवर सुनावणी घेऊन पोलीस अधिक्षक तक्रारींचा निपटारा करतात. परंतु बहुदा तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वरिष्ठ अधिकारी ऐकत नसल्याने एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याची बाजू घेणार या समजमुळे तक्रारच केली जात नाही.
.........
त्रास द्यायचा असल्यास त्रासाची ड्युटी लावा
एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला नाहक त्रास द्यायचा असेल तर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी कठीण काम किंवा सर्वाधिक त्रासाचे काम असलेल्या ठिकाणी त्याची ड्युटी लावली जाते. एक ड्युटी केल्यावर पुन्हा लगेच कामावर बोलावले जाते. बंदोबस्ताच्या नावावर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी बोलावले जाते.
.............
मनात खदखद पण तक्रार का करू?
एका पोलीस ठाण्यात ४० ते ५० कर्मचारी असतात परंतु साहेब हेतूपुरस्सर आपल्यालाच त्रास देण्यासाठी वारंवार आपली ड्यूटी लावतो असे अनेक कर्मचाऱ्यांना वाटतो. साहेब आपल्यालाच टार्गेट करतो ,म्हणून त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करावी असे अनेक पोलिसांना वाटते. परंतु तक्रार केल्यावर त्या तक्रारीवर पांघरून घातले जाते. त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याविषयी पोलीस कर्मचाऱ्याच्या मनात खदखद असते परंतु आपले कुणीच ऐकणार नाही म्हणून ते मुकाट्याने त्रास सहन करतात.