अर्जुनी-मोरगाव : संपूर्ण विश्वातील सर्व गुरूंना नमन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी प्रत्येक
शिष्य आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करीत असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अतोनात कष्ट घेत असतात. कुंभार ज्याप्रमाणे मडके मजबूत होण्यासाठी त्याला थापट्या मारतो व मजबूत बनवतो. त्याप्रमाणे गुरूही आपल्या शिष्याला घडविण्यासाठी प्रसंगी छडी मारण्याची शिक्षा करतो. विद्यार्थीदशेत शिक्षा करणारी ही छडी मात्र विद्यार्थ्यांचे भविष्य सावरत असते, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा पूजन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, प्रा. यादव बुरडे, प्रा. टी. एस. बी. सेन, संजय बंगळे, राजेंद्र काकडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवी सरस्वती व गुरुमाऊली संत ज्ञानेश्वर तसेच ओमच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे यांनी गुरूविषयी माहिती विशद केली. नानोटी यांनी, गुरू हे खरे मार्गदर्शक असतात. शिष्याने गुरूंचा मान ठेवावा असे सांगितले. तसेच घाटे यांनी, नेहमी गुरुप्रति कृतज्ञ असावे असे सांगितले.
यावेळी वर्ग ५ ते ७ साठी पीडीएफद्वारे ऑनलाइन गुरुपौर्णिमा कार्यक्रम तर वर्ग ६ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. तसेच प्रत्येक वर्गात प्रार्थना, समूहगीत भजन, गुरुपदेश पर कथाकथन, संकल्प व प्रसाद वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. संचालन करून आभार लोथे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मूल्य शिक्षण समिती प्रमुख अर्चना गुरनुले, भाग्यश्री सिडाम, महेश पालीवाल, प्रा. नंदा लाडसे, प्रा. इंद्रनील काशिवार, पंकज मोरे यांनी सहकार्य केले.