अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुल जीर्ण झाला असून तो पाडून नवीन पूल तयार करण्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर प्रशासनाने हा पूल जड वाहतुकीसाठी पूर्णपणे वर्षभरापुर्वी बंद केला. आता हा पूल पाडण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून यासाठी मुंबई येथील कंपनीची निवड करण्यात आली आहे. जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च येणार असून या खर्चाला मंजुरी सुध्दा मिळाली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावर ब्रिटीश सरकारच्या कालावधीत उड्डाणपुल तयार करण्यात आला होता. मात्र या उड्डाणपुलाची बांधकामासाठी निश्चित केलेली कालमर्यादा संपली. तर रेल्वे ट्रॅक परिसरातील या पुलाचा काही भाग खचत चालला आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने या पुलाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट केले होते. त्यात हा पूल जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याची बाब पुढे आली. यानंतर रेल्वे विभागाने जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जुलै २०१८ मध्ये पत्र देऊन हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यास सांगितले. होते मात्र यानंतरही या दोन्ही विभागाने ही बाब गांर्भियाने घेतली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर जुन्या जीर्ण उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच या पुलावरुन केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश सुरू ठेवण्यात आला. जुना जीर्ण उड्डाणपुल पाडून नवीन उड्डाणपूल तयार करण्याची बाब ही खर्चिक असल्याने त्याला राज्य शासनाची मंजुरी आवश्यक होती. यानंतर शासनाने नवीन उड्डाणपुल बांधकामासाठी ८३ कोटी रुपये आणि जुना जीर्ण झालेला उड्डाणपुल पाडण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. मात्र यासर्व गोष्टींना दीड वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना हा पूल पाडण्याचा कामाला वेग आला नव्हता. तर दुसरीकडे पुलाचा काही भाग खचत चालला असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकमतने याकडे लक्ष वेधल्यानंतर आता जीर्ण उड्डाणपुल पाडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाने जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्यासाठी रेल्वेच्या जेईडी विभागाची परवानगी मिळण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच पत्र दिले आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर आणि त्यांच्याकडून हा पूल पाडण्यासाठी निर्देश मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे.उड्डाणपूल पाडण्यासाठी मुंबई येथील एजन्सीची निवडउड्डाणपुल पाडण्याचे काम हे तांत्रिकदृष्टया फार किचकट आणि जोखमीचे आहे. तसेच हे काम करणाऱ्या महाराष्टÑात केवळ दोन एजन्सी आहेत. नागपूर छत्रपती चौकातील उड्डाणपुल पाडणाºया मत्ते अॅन्स सॅन्स कंपनीलाच गोंदिया येथील जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्याचे काम देण्यात येणार आहे. यासाठी निविदा बोलावून काम देण्यात येणार आहे. जीर्ण उड्डाणपुल पाडण्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वेला घ्यावा लागणार मेगा ब्लॉकशहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुलाचा काही भाग हा रेल्वे ट्रॅक परिसरात आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडून हा पूल पाडण्यासाठी सर्व तांत्रिक बाबीचा नकाशा, वेळापत्रक, मेगा ब्लॉक कोणत्या कालावधीत घ्यायाचा यासंदर्भातील मंजुरीचे पत्र मिळाल्यानंतर पूल पाडण्याचा कामाला सुरूवात केला जाणार आहे. पूल पाडण्यासाठी जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.शहरातील जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.रेल्वे विभागाच्या जेईडी विभागाची मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.पूल पाडण्यासाठी मुंबई येथील एजन्सीची निवड करण्यात आली आहे.- मिथिलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.
सहा कोटी खर्चून पाडणार उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:00 AM
गोंदिया-बालाघाट मार्गावर ब्रिटीश सरकारच्या कालावधीत उड्डाणपुल तयार करण्यात आला होता. मात्र या उड्डाणपुलाची बांधकामासाठी निश्चित केलेली कालमर्यादा संपली. तर रेल्वे ट्रॅक परिसरातील या पुलाचा काही भाग खचत चालला आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने या पुलाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट केले होते. त्यात हा पूल जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याची बाब पुढे आली.
ठळक मुद्देप्रक्रिया अंतिम टप्प्यात। रेल्वे विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा, पूल पाडण्यासाठी लागणार चार महिन्यांचा कालावधी