देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुष्ठरुग्ण शोधून काढणे तसेच या आजाराचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करून औषधोपचार सुरू केले जात आहेत. जिल्ह्यात गत ११ वर्षांत ५९०२ कुष्ठरुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यावर्षात २७ सप्टेंबरपर्यत २३१ रुग्ण कुष्ठरुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाने या रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.देशात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजारावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उपचार झाले नाहीत किंवा उशिराने उपचार केल्यास रुग्णांमध्ये कायमस्वरूपी विकृती येण्याचा धोका असतो. त्यामुळे केंद्र सरकारने या आजाराचे रुग्ण शोधून त्यांना योग्य उपचार देणे तसेच २०२० पर्यंत या आजाराचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षात आतापर्यत २३१ कुष्ठरुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये महिला रुग्णांचे प्रमाण ४३.४० टक्के इतके आढळले आहे. या आजाराबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी जनजगृती करण्यात येत आहे.नागरिकांना माहितीपत्रके देण्यात येत आहेत. या पत्रकांत कुष्ठरोग, क्षयरोग, मधुमेह, कॅन्सर या आजारांबाबत माहिती देण्यात आली आहे.आजार कशामुळे होतात, आजार टाळण्यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे.या आजारांची लक्षणे काय आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. १३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेतही या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.शोध अभियानात आढळले ५६ कुष्ठरुग्णसंयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्य रोग व प्रतिबंध जागृकता अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण सुरु आहे. या १४ दिवसांच्या सर्वेक्षणात आशा सेविकांच्या माध्यमातून त्वचेचे, तसेच इतर नमुने घेतले जात आहे. या सर्वेक्षणात २७ सप्टेंबरपर्यत ५६ कुष्ठ रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार त्यांना औषधोपचार करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.
कुष्ठरोगाची लक्षणेकुष्ठरोग हा मायक्रो बॅक्टेरियम लेप्री या कुष्ठ जंतूमुळे होतो. साधारणपणे आपल्याकडे ९८ टक्के नागरिकांत कुष्ठरोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याने कुष्ठरोग सहसा होत नाही. शंभर नवीन कुष्ठरुग्णांपैकी साधारण १० ते १५ रुग्णांपासून दुसऱ्यास कुष्ठरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कुष्ठरोगासाठी विशिष्ट वयोगट नाही, हा आजार कुणालाही होऊ शकतो.