गोंदिया : पुढील पिढी सुदृढ व्हावी, यासाठी अंगणवाडीपासून तर शालेय विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. या विशेष तपासणीअंतर्गत २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात ९६ बालक हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. मात्र आरोग्य विभागाच्या ढिसाळपणामुळे त्यापैकी केवळ सहा बालकांच्या शस्त्रक्रिया होऊ शकल्या. ९० बालक या शस्त्रक्रियेपासून वंचित आहेत.जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये गेल्या वर्षभरात ९६ हजार ५८५ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील ४५ बालकांना हृदयरोग असल्याचे लक्षात आले. याशिवाय १२८ बालकांची इतर शस्त्रक्रियांसाठी निवड करण्यात आली. यापैकी फक्त ४ बालकांची हृदय शस्त्रक्रिया तर ६७ मुलांच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शालेय स्तरावरील दोन लाख १० हजार ६९६ बालकांची तपासणी करण्यात आली. यात हृदयरोगाचे ५१ बालक तर इतर आजारांच्या १७१ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. यातील केवळ दोन बालकांची हृदय शस्त्रक्रिया तर इतर आजारांच्या ११३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.केवळ हृदयरुग्णांचा विचार केल्यास गेल्यावर्षीच्या ३३ रुग्णांवर आणि यावर्षीच्या ९० हृदयरुग्ण बालकांवर शस्त्रक्रिया करणे बाकी आहेत. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी १००० पेक्षा जास्त ‘वेटिंग लिस्ट’ असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे ज्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड केली त्यातील अनेकांची शस्त्रक्रिया सहन करण्याचीही शक्ती नाही. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया टाळल्या जात आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यातील बाल आरोग्य कार्यक्रम चर्चेचा विषय झाला आहे. बाल आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत जिल्हास्तरापासून तर तालुकास्तरापर्यंत अधिकारी-कर्मचारी एकमेकांवर चिखलफेक करण्यातच मग्न असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमात काम करणारे डॉक्टर व कर्मचारी प्रत्यक्ष आपल्या कामाकडे दुर्लक्षच करीत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात ते मश्गूल झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
९६ पैकी सहाच ुुहृदयरोग शस्त्रक्रिया
By admin | Published: April 10, 2015 1:29 AM