बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्यावतीने महालगाव येथे कीटकनाशके हाताळताना व फवारताना घ्यावयाची काळजी, या विषयावर कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांज़ेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडल कृषी अधिकारी सुधीर वरकडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक घन:श्याम चचाणे, कृषी सहायक विजय झडपे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच माधवराव नाईक, संसाधन शेतकरी अशोक लंजे यांची उपस्थिती होती.
मंडल अधिकारी वरकडे यांनी, कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, फवारणीची वेळ, कीटकनाशके कशाप्रकारे हाताळायची, फवारणी कीट इत्यादीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. तसेच कृषी विभागाच्या स्मार्ट, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, उद्योगांचे अन्नयन योजना याबाबत सविस्तर माहिती वरकडे यांनी दिली.
संचालन व प्रास्ताविक कृषी सहायक विजय झडपे यांनी केेले, तर आभार घन:श्याम चचाणे यांनी मानले. शेतकरी मित्र मुकेश नाईक, उमेद अभियानाचे कृषी व्यवस्थापक सुधीर मेश्राम, कृषी सखी रागिणी रामटेके, दुर्गा भोयर यांनी सहकार्य केले.