जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट या दोन्ही विभागांना देण्यात आले आहे. मात्र यंदा गोदामे रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ही ३० जूनपर्यंत आहे. त्यातच गोंधळात १५ दिवस निघून गेलेले आहे. त्यामुळे उर्वरित पंधरा दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी हाेणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यंदा रब्बीतील धानाचे सरासरी उत्पादन सुध्दा जास्त आहे. त्यामुळे ३५ लाख क्विंटलपर्यंत रब्बीतील धानाचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मात्र मागील खरीप हंगामातील धान या दोन्ही विभागाच्या गोदामात तसाच पडला आहे. ३५ क्विंटल धानापैकी राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ तीन लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १०६ खरेदी केंद्र सुरु केले असले तरी यापैकी प्रत्यक्षात किती केंद्रावर धान खरेदी सुरु आहे याची कल्पना शेतकरी आणि जिल्हावासीयांना चांगलीच आहे.
.............
२८२ राईस मिलर्ससह करार
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करुन शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जातो. यासाठी २८२ राईस मिलर्ससह करार करण्यात आला. या राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ अडीच लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटलवर धान अद्यापही धान खरेदी करणाऱ्या विविध संस्थांच्या गोदामांमध्ये पडला आहे. त्यामुळेच रब्बीतील खरेदी केलेला धान ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.
.....
उद्दिष्ट २८ लाख क्विंटल धान खरेदीचे
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र १५ जूनपर्यंत केवळ ४ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर गोदाम फुल्ल असल्याने अनेक संस्थांची खरेदी बंद आहे. त्यामुळे उर्वरित १५ दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी होणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
.............
शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात
गोदाम हाऊसफुल्ल असल्याने अनेक संस्थांची धान खरेदी ठप्प आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तर घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले असून ते अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
............