गोंदिया : शहरातील छोटा गोंदिया परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांची उत्पत्ती वाढून हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मुख्यत: लहान बालक या आजाराला बळी पडत असून, दोन बालकांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत आहेत. तातडीने उपाययोजना हाती घेण्याची मागणी होत आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली. कधी उघाड तर कधी पावसाची रिपरिप अशी स्थिती आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. त्यातच शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. छोटा गोंदिया परिसरात तर त्यापेक्षाही स्थिती वाईट आहे. याठिकाणच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सांडपाण्याचे डबके ठिकठिकाणी साचले आहेत. शिवाय कचऱ्याची देखील नियमित उचल होत नसल्यामुळे कचरा कुजला असून, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या पावसाने उघाड दिला असून, डासांची संख्या देखील वाढली आहे. गेल्या महिनाभरापासून हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गल्लीबोळात हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. लहान बालकांना देखील या आजारांची लागण झाली असून, दोन बालकांचा जीव देखील गेला. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. पालिकेने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
.....
जनशक्ती संघटनेचे नगराध्यक्षांना साकडे
जनशक्ती संघटना भेटली नगराध्यक्षांना
छोटा गोंदियातील हिवताप आणि डेंग्यूचा प्रकोप रोखण्याकरिता फवारणी आणि स्वच्छता आदी उपाययोजना राबविण्यात याव्यात, याकरिता जनशक्ती संघटनेचे तीर्थराज उके, मयूर मेश्राम, अनिल शरणागत, ताकेश पहिरे, देवा शेंडे, कैलाश शेंडे, राजेश मेश्राम यांनी नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांची भेट घेतली. दरम्यान, नगराध्यक्ष इंगळे यांनी आरोग्य विभागाशी समन्वय साधून उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.