लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत आणि शाळेतून घरी जाण्यासाठी मोफत बससेवा आणि काही विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास योजना सुरू केली आहे. आता विद्यार्थ्यांना यासाठी स्मार्ट कार्ड तयार करणे अनिवार्य केले आहे. मात्र आगारात गेल्यानंतर लगेच स्मार्ट कार्ड तयार होत नसल्याने आणि त्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी ये-जा करण्याचा आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनीना बसचा मोफत प्रवास आहे.तर इतर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जात आहे.गोंदिया येथे दररोज आमगाव, गोरेगाव, सालेकसा, देवरी, गोंदिया या पाच तालुक्यांतील विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी यावे लागते. स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी एसटी महामंडळाने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ अशी वेळ निर्धारित करुन दिली आहे. स्मार्टकार्ड तयार करण्यासाठी एसटी महामंडळाचा एकुलता एक संगणक आहे. अनेकदा लिंक फेल असते. सकाळी सहा वाजतापासून या लहान लहान मुलांसोबत त्यांचे आई-वडील सुध्दा येतात. रोज जास्तीत जास्त ५० ते ६० स्मार्टकार्ड तयार केले जातात. गोंदिया विभागाच्या पासधारक विद्यार्थ्यांची संख्या पाच हजारावर आहे.विद्यार्थ्यांचे आई-वडील सुध्दा आपल्या पाल्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपली कामे बाजूला ठेऊन त्यांच्यासोबत स्मार्ट कार्ड पास तयार करण्यासाठी गोंदिया येथे येतात. मात्र दिवसभर प्रतीक्षा करुन त्यांना पास न तयार करताच आल्या पावलीच परत जावे लागते. यामुळे त्यांचे दिवसभराचे श्रम सुध्दा वाया जात नसून त्यांना आर्थिक भूर्दंड सुध्दा सहन करावा लागत आहे.स्मार्ट कार्ड बनल्याशिवाय पास बनणार नाही म्हणून मुले शाळेला दांडी मारून शाळेत न जाता एसटी महामंडळाच्या कार्यालयासमोर ताटकळत उभी राहत असल्याचे चित्र दररोज येथील बस स्थानकावर पाहयला मिळत आहे. एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड बनण्यास जो विलंब होत आहे, तोपर्यंत पासची व्यवस्था करावी. अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होतच राहणार आहे.त्यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्य उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.
स्मार्ट कार्ड पास बनले विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 5:00 AM
आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनीना बसचा मोफत प्रवास आहे.तर इतर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जात आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष